भारतीय मच्छीमारांनी वाचवले बुडणा-या पाकिस्तानी सैनिकांना
By admin | Published: April 12, 2017 06:41 PM2017-04-12T18:41:09+5:302017-04-12T18:41:09+5:30
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. मात्र या परिस्थितीतही भारतीय मच्छीमारांनी..
Next
ऑनलाइन लोकमत
ओखा, दि. 12- पाकिस्तानने न्यायप्रक्रियेचे सर्व नियम धाब्यावर बसवून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. मात्र या परिस्थितीतही भारतीय मच्छीमारांनी पाकिस्तान सागरी सुरक्षा संस्थेच्या समुद्रात बुडणा-या दोन अधिका-यांना वाचवून आपल्यातील माणूसकीचे दर्शन घडवले. रविवारी अरबी समुद्रात गुजरातच्या किना-यापासून काही अंतरावर ही घटना घडली.
पाकिस्तानी पीएमएसएचे जवान भारतीय मच्छीमारांना अटक करण्यासाठी आले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. भारतीय सागरी हद्दीत 10 नॉटीकल माइल आतपर्यंत पीएमएसएच्या बोटी आल्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली. मासेमारी करणा-या 10 भारतीय मच्छीमार बोटींना ताब्यात घेऊन पीएमएसएचे जवान कराचीच्या दिशेने निघाले असताना पीएमएसएच्या ताफ्यातील एका स्पीड बोट भारतीय नौकेला धडकून बुडाली.
बुडालेल्या बोटीत सहाजण होते. त्यातील दोघांना मच्छीमारांनी वाचवले. भारतीय तटरक्षक दलाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोध मोहिम सुरु केली. तटरक्षक दलाला बेपत्ता असलेल्या चौघांपैकी तिघांचे मृतदेह सापडले. हे मृतदेह पीएमएसएच्या ताब्यात देण्यात आले. भारताच्या या मदतीनंतर पीएमएसएनेही सोमवारी रात्री सात बोटी आणि 60 मच्छीमारांची सुटका केली.