भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी चोरांनी लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 03:49 PM2019-03-08T15:49:28+5:302019-03-08T15:51:34+5:30
26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केले. यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट देण्यात आला होता. नौदलाने मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा दिला होता
अहमदाबाद - भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या कच्छ येथील सागरी सीमेलगत पाकिस्तानच्या चोरांनी दोन भारतीय बोटींना लुटले. सध्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. सागरी सीमेवरही भारतीय नौदल करडी नजर ठेऊन आहे. या सुरक्षेला छेद देत अवैधरित्या पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय बोटींना आपलं लक्ष्य केलं.
मासे पकडण्यासाठी गेलेले मच्छिमार एकदा समुद्रात गेले की पंधरा ते वीस दिवसांनंतर माघारी परततात. 14 फेब्रुवारीच्या पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केले. यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट देण्यात आला होता. नौदलाने मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा दिला होता. सागरी सीमेलगत जावू नये अशा सूचना भारतीय नौदलाने दिल्या होत्या. मात्र प्रशासनाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून मच्छिमार समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात.
मिळालेल्या माहितीनुसार, कच्छ येथील भारत-पाक सागरी सीमेलगत पाकिस्तानच्या स्पीड बोटीने आलेल्या चोरांनी दोन मच्छिमारांना लुटले. इतकचं नाही तर मच्छिमारांना मारहाण करून त्यांच्याजवळील सामानही हिसकावून घेतले. सुरक्षा यंत्रणांना ही बाब लक्षात येताच त्यांना आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच सागरी सीमेवर बीएसएफ आणि नौदलाकडून गस्त वाढविण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरात येथील कच्छ सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने एका 50 वर्षीय संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली होती. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात हायअलर्ट असल्याने सुरक्षा यंत्रणा अनेक ठिकाणी सज्ज आहेत. या हल्ल्यात सीआऱपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना खतपाणी देणे बंद न केल्यास भारत चोख प्रत्युत्तर देईल असा इशाराही भारताने पाकिस्तानला दिला होती. त्यानंतर पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले.