गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई अन्...अमेरिकेत लपलेले 10 कुख्यात गुन्हेगार अडचणीत; यादी तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:21 IST2025-02-12T18:20:57+5:302025-02-12T18:21:41+5:30
Indian Gangster List: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारांतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.

गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई अन्...अमेरिकेत लपलेले 10 कुख्यात गुन्हेगार अडचणीत; यादी तयार
10 Indian Gangster List: भारतात मोस्ट वॉन्टेड असलेले अनेक कुख्यात गुन्हेगार अमेरिका, कॅनडासारख्या देशांमध्ये लपून बसले आहेत. या गुन्हेगारांना परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणा लवकरच अमेरिकेत राहणाऱ्या 10 मोस्ट वाँटेड गुंडांची यादी अमेरिकन सुरक्षा एजन्सीकडे सोपवणार आहे. या यादीत गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोईसारख्या गुंडांचाही समावेश आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या करारांतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. या करारानुसार, दोन्ही देश एकमेकांच्या देशांमध्ये लपून बसलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आणि त्यांची माहिती देण्यासाठी कटिबद्ध आहेत.
उच्चस्तरीय बैठकीनंतर निर्णय
गेल्या वर्षभरात भारत आणि अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावर अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्या आहेत. दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये हे मान्य करण्यात आले की, गुन्हेगारांवर संयुक्त कारवाई केली जाईल, त्याअंतर्गत आता भारतीय एजन्सी यादी सोपवण्याच्या प्रक्रियेला अंतिम रूप देत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याशी संबंध नाही
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ही बाब चर्चेत आली होती, मात्र या यादीचा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याशी थेट संबंध नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ही कारवाई भारत आणि अमेरिका यांच्यात आधीच झालेल्या परस्पर कराराचा भाग आहे, जी आता लागू केली जात आहे.
पुढील प्रक्रिया
अमेरिकन सुरक्षा संस्था या यादीत सामील असलेल्या गुंडांची चौकशी करणार आहेत. गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे धोरण आखतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील गुन्हेगारी आणि सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. येत्या काही दिवसांत या कारवाईबाबत आणखी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.