भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:59 PM2024-11-29T14:59:42+5:302024-11-29T15:01:29+5:30
भारतीय गुंड आता अमेरिकेत आपला नवा तळ बनवत आहेत. डंकी पद्धतीने इतर देशात प्रवेश करत आहेत.
लॉरेन्स बिश्नोईमुळे आता देशात पुन्हा एकदा टोळीयुध्द वाढल्याचे समोर आले आहे. भारतात गुन्हेगारी करायची आणि परदेशात लपायचे. परदेशात राहणाऱ्या भारतीय गुंडांना आता नवीन लपण्याचे ठिकाण सापडले आहे. आतापर्यंत बहुतांश भारतीय गुंड कॅनडा आणि आखाती देशांमध्ये कार्यरत होते, पण आता ते त्यांचे ठिकाण बदलत आहेत.
दुबईतून हद्दपार करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शुटरने पोलिस चौकशीत खुलासा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोई टोळीसह भारतातून वॉन्टेड गुन्हेगारांसाठी अमेरिका आता नवीन ठिकाण बनत आहे. आरोपीने सांगितले की, भारतातून फरार झालेले गुंड बनावट पासपोर्टवर डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश करत आहेत.
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; पोलिसांना घाबरू नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
दिल्लीतील नजफगडमध्ये दुहेरी हत्याकांड घडवून आणल्यानंतर लॉरेन्स गँगचा शार्प शूटर हर्ष उर्फ चिंटू याने पंजाबमधून बनावट पासपोर्ट बनवला होता. हर्ष उर्फ चिंटूच्या या पासपोर्टची प्रत समोर आली आहे. हा पासपोर्ट पंजाबच्या जालंधर येथून २६ मार्च रोजी जारी करण्यात आला होता. पासपोर्टमध्ये हर्षचे नाव प्रदीप कुमार असे लिहिले आहे. हर्षने सांगितले की, अशा अनेक गुंडांना अमेरिकेत जाण्यासाठी बनावट पासपोर्ट बनवले जात आहेत.
आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, आधी त्याला पंजाबचा बनावट पासपोर्ट मिळाला, त्यानंतर तो भारतातून शारजाहला गेला. शारजहानहून तो पुन्हा बाकूला गेला आणि इथून युरोपातल्या एका देशात. यानंतर डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश करण्याचा त्याचा प्लॅन होता.
गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, रोहित गोदारा, मॉन्टी मान, पवन बिश्नोई आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचा अँटी गँग गँगस्टर हिमांशू भाऊ यांच्यासह अनेक वॉन्टेड गुन्हेगार सध्या अमेरिकेत आहेत, हे सर्वजण डंकी पद्धतीने अमेरिकेत पोहोचले होते. आता हे सगळे गुंड अमेरिकेत बसून भारतात गुन्हे घडवत आहेत.