"बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, परिस्थिती नियंत्रणाबाहेर"; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली संपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:04 PM2024-08-06T16:04:27+5:302024-08-06T16:22:12+5:30
अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर सरकारची नजर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली.
Foreign Minister S. Jaishankar : बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात पोहोचल्या होत्या. भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. त्यानंतर आता हसीना यांनी भारतही सोडल्याचे बोलले जात आहे. अशातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील ताज्या परिस्थितीबद्दल सर्वपक्षीय बैठकीत माहिती दिली आहे. भारताच्या भूमिकेवर सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिली. दुसरीकडे सरकार बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही जयशंकर यांनी म्हटलं आहे.
मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील परिस्थितीवर राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथील अल्पसंख्याक समुदाय हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ला केला, त्यानंतर परिस्थिती चिघळली, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं. राजीनाम्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची परवानगी मागितल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.
१२ हजार भारतीय बांगलादेशात
"बांगलादेशमध्ये आंदोलनांदरम्यान सर्वात चिंतेची बाब म्हणजे तिथल्या हिंदू अल्पसंख्याकांच्या व्यापारी प्रतिष्ठानांवर आणि मंदिरांवर हल्ले झाले आहेत. मोदी सरकार ढाका प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. त्यांना त्यांचे राजदूत आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यास सांगितले आहे. एकूण २० हजार भारतीय बांगलादेशात आहेत. या गोंधळानंतर लगेचच आमच्या बाजूने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्यानंतर ८ हजार लोक भारतात परतले आहेत. मात्र १२ हजार लोक आतापर्यंत तिथेच आहेत. बांगलादेशात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर आमचे सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. तिथल्या आंदोलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे," असे मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.
शेख हसीना यांच्यासोबत थोडक्यात चर्चा
"बांगलादेशात जुलैपासून हिंसाचार सुरू आहे. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने तेथील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला होता. असे असतानाही आंदोलने सुरूच होती. ४ ऑगस्टला परिस्थिती आणखीनच बिकट झाली. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. ५ ऑगस्ट रोजी संचारबंदी लागू करण्यात आली. असे असतानाही रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला. लष्करप्रमुखांनी देशाला संबोधित करत शांततेचे आवाहन केले आहे. हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता आणि अत्यंत कमी वेळात भारतात येण्याची परवानगी मागितली होती. या संपूर्ण घटनेनंतर सीमेवर बीएसएफला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. तसेच सरकारने हसिना यांच्याशीही थोडक्यात चर्चा केली आहे," असेही परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे.