2024 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या होईल अर्धी; नितीन गडकरींचा मोठा दावा, सांगितला सरकारचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 05:41 PM2022-08-02T17:41:20+5:302022-08-02T17:42:01+5:30
दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे...
भारतात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात (Road Accidents) आपला जीव गमावतात. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच, रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार कंबरकसून काम करत आहे. 2024 च्या अखेरपर्यंत देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल, असा दावा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला.
केंद्रीय मंत्र्यांनी दिली अशी माहिती -
गडकरी म्हणाले, सरकारने महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट्स संपवण्यासाठी आता पर्यंत 25 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. इंदूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे आणि 2024 च्या अखेरपर्यंत आपघात आणि मृतांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सरकारने योजना आखली आहे.
खर्च करण्यात आले 25 हजार कोटी -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 2024 पर्यंत रस्ते अपघात निम्म्यावर आणण्यासाठी सरकार महामार्गांवरील ब्लॅक-स्पॉट हटविण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या अशा भागाला ब्लॅक-स्पॉट म्हटले जाते, जेथे 3 वर्षांत पाच रस्ते अपघात झालेले असतील, अथवा, याच काळात 10 मृत्यू झालेले असतील. गडकरी म्हणाले, ब्लॅक-स्पॉट हटविण्यासाठी सरकारने आतापर्यंत 25,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या मदतीने सरकार 15,000 कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांवर काम करत आहे.