भारतीय हॅकर्सचं पाकिस्तानला प्रत्युत्तर, 500 वेबसाइट केल्या हॅक
By admin | Published: April 26, 2017 06:01 AM2017-04-26T06:01:37+5:302017-04-26T06:09:37+5:30
भारतीय हॅकरच्या एका गटाने पाकिस्तानातील 500 हून जास्त संकेतस्थळं केली हॅक,मुख्य राजकीय पक्षांपैकी एक "पाकिस्तान पीपल्स पार्टी"च्या वेबसाइटचाही समावेश
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - भारतातील दहा प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ‘पाकिस्तान हॅकर्स’ नावाच्या एका गटाने दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह 10 संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांवर "पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा टाकून ही संकेतस्थळे हॅक केली. त्यानंतर आता भारतीय हॅकरच्या एका गटाने पाकिस्तानातील 500 हून जास्त संकेतस्थळं हॅक केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानमधील मुख्य राजकीय पक्षांपैकी एक "पाकिस्तान पीपल्स पार्टी"चं संकेतस्थळही हॅक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. "आज तक"ने याबाबत वृत्त दिलं आहे.
या वृत्तानुसार, भारतीय हॅकरच्या एका गटाने "रॅंन्समवेअर"द्वारे पाकिस्तानातील 500 हून जास्त वेबसाइट हॅक केल्या आहेत. यामध्ये मुख्य राजकीय पक्षांपैकी एक "पाकिस्तान पीपल्स पार्टी"च्या वेबसाइटचाही समावेश आहे. हॅक करण्यात आलेल्यांपैकी जास्त वेबसाइट या पाकिस्तान सरकारशी संलग्न आहेत. विशेष म्हणजे वेबसाइट हॅक करण्यासाठी "रॅंन्समवेअर"चा वापर करण्यात आला आहे. "रॅंन्समवेअर"द्वारे हॅक केलेल्या वेबसाइटला हॅकरच्या तावडीतून सोडवणं कठीण असतं आणि शक्यतो त्यासाठी पैशांची तोडजोड केली जाते. वेबसाइटवर हॅकर्सनी फेसबुक पेजची माहिती दिलेली असते तेथे पैशांबाबतची बोलणी केली जाते.
"टीम इंडियन ब्लॅक हॅट" असं हॅक करणा-या गटाचं नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हॅक करण्यात आलेल्या वेबसाइटवर "केरला सायबर वॉरिअर्स" असं लिहिण्यात आलं आहे. पण इतक्या वेबसाइट एका गटाने हॅक केल्या नसून यामध्ये Luzsecind, team black hats आणि United Indian hackers अशा अनेक गटांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दिवसांमध्ये आणखी वेबसाइट हॅक करणार असल्याचा दावाही हॅकर्सनी केला आहे.
यापुर्वी भारतातील दहा प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करून त्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ही घोषणा टाकल्याने खळबळ उडाली. दिल्ली विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-बीएचयू या संस्थांसह दहा वेबसाइट्सवर हल्ला चढविणाऱ्याने आपण पाकिस्तान हॅक्झॉर क्रू असल्याचे म्हटले.
काश्मीरचा राग आवळला-
या वेबसाइट्सवर टाकण्यात आलेल्या दोन व्हिडीओंसोबत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी ओळ आहे. यात काश्मिरात निर्दयीपणे अत्याचार करणाऱ्या भारतीय लष्कराविरुद्ध काश्मिरी लोक निदर्शने करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली असून, वेबसाइट लवकरच ठीक केली जाईल.
विद्यापीठे झाली सतर्क-
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा प्रकार आमच्याही निदर्शनास आला असून, विद्यापीठाचा आयटी विभाग हा प्रकार रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय करीत आहे. तथापि, आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-बीएचयूची यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
भारतीयांना इशारा-
वेबसाइट्सवर टाकण्यात आलेल्या संंदेशात हॅकर्सनी असे म्हटले आहे की, भारत सरकार आणि भारतीय जनतेला अभिवादन! तुमचे तथाकथित जवान काश्मिरात काय करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? काश्मिरात अनेक निरपराध लोक मारले जात आहेत, हे ठाऊक आहे का? त्यांनी अनेक मुलींवर बलात्कार केला आहे. ते आजही काश्मीरमधील मुलींवर कुकर्म करीत आहेत? हे माहीत आहे का? तुमचे भाऊ, बहीण, आई-वडिलांना ठार मारले, तर काय वाटेल? तुमच्या आई-बहिणीवर बलात्कार केल्यास काय वाटेल? तुमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही का?