भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानी क्लबमध्ये ' नो एन्ट्री'
By Admin | Published: October 29, 2015 10:23 AM2015-10-29T10:23:15+5:302015-10-29T10:26:22+5:30
भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्याचे प्रयत्न होत असतानाच कराचीतील सिंध क्लबने भारतीय उच्चायुक्त राघवन यांना क्लबमध्ये प्रवेश देण्यास नकार दिल्याचे उघड झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्याचे प्रयत्न होत असतानाच पाकिस्तानमधील एका क्लबने भारताचे उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन प्रवेश देण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर येत आहे. विशेष म्हणजे भारताचे उच्चायुक्त राघवन व त्यांच्या कुटुंबाला या क्लबमध्ये होणा-या एका कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण मिळालेले असतानाही ऐनवेळेस घूमजाव करत क्लबच्या अधिका-यांनी राघवन यांच्या प्रवेशास नकार दर्शवला. २६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून दिल्ली व कराचीतील सूत्रांनीही या घटनेला दुजोरा दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.
कराचीतील अतिशय जुना व प्रतिष्ठित अशा 'सिंध' क्लबमध्ये होणा-या एका विशेष कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राघव कराचीला गेले होते, मात्र सिंध क्लबच्या अधिका-यांनी कोणतेही कारण न देता राघवन यांना प्रवेश देण्यास नकार दिला. मोहम्मद अली जीना यांचा नातू लिकायत मर्चंट को- चेअरमन असलेल्या 'पाकिस्तान-इंडिया सिटिझन्स फ्रेंडशिप फोरम' या ग्रुपद्वारे सिंध क्लबमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आणि त्या कार्यक्रमासाठी आयोजकांनी भारतीय उच्चायुक्त राघवन यांनाही निमंत्रण दिले होते. कराचीत कुटुंबियांसह एका हॉटेलमध्ये उतरलेल्या राघवन यांना क्लबने प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचा अधिकृत संदेश क्लबच्या अधिका-यांनी दिला, मात्र त्यामागील कारण त्यांना विशद करण्यात आले नाही. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतली आहे.
शिवसेनेने मुंबईत पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली खान यांचा कार्यक्रम होऊ न दिल्यानेच, त्याच्या निषेधार्थ सिंध क्लबच्या अधिका-यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत असली तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.