इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्येही ‘मी टू’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:54 AM2018-10-31T04:54:52+5:302018-10-31T04:55:49+5:30
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. मद्रास यांना सक्तीची निवृत्ती
बंगळुरू : लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधील (आयआयएससी) वरिष्ठ प्राध्यापक आणि अनेक पुरस्कारांचे विजेते गिरीधर मद्रास यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे. गिरीधर मद्रास यांची गणना जगातील महत्त्वाच्या वैज्ञानिकांमध्ये करण्यात येते.
गिरीधर मद्रास हे अनेक वर्षे या संस्थेत शिकवत होते. आयआयएससीचे संचालक प्रा. अनुराग कुमार यांनी सांगितले की, ज्या बैठकीत प्रा. मद्रास यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्याचा निर्णय घेण्यात आला, त्या बैठकीच्या इतिवृत्तालाही आता मान्यता देण्यात आली आहे. सक्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडलेल्या प्रा. मद्रास यांना निवृत्तीनंतरचे फायदे मिळतील का, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
यापुढील काळात याच संस्थेत अन्य काम ते करू शकतील का, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमच्याकडे प्रा. मद्रास यांच्याविरोधात अलीकडेच लैंगिक शोषणाची तक्रार आली होती. तिची लगेचच चौकशी करून त्यांना सक्तीने निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे प्रा. अनुराग कुमार म्हणाले. काही जुन्या तक्रारीही आल्या होत्या; पण त्यात आता जाणे शक्य नाही, असे त्यांनी सूचित केले. (वृत्तसंस्था)
प्लास्टिक विघटनाचे संशोधन
प्रा. गिरीधर मद्रास यांना याआधी एस. एस. भटनागर पुरस्कार, स्कोपस यंग सायंटिस्ट अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. सध्या ते प्लास्टिकच्या विघटनाशी संबंधित संशोधन करीत होते. संस्थेने घेतलेल्या निर्णयावर त्यांची प्रतिक्रिया मात्र समजू शकली नाही.