दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद
By admin | Published: October 28, 2016 11:30 PM2016-10-28T23:30:31+5:302016-10-29T00:11:13+5:30
सर्जिकल स्ट्राइकनंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे.
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 28 - सर्जिकल स्ट्राइकनंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. दहशतवाद्यांच्या आडून पाकिस्तान सीमेपलीकडून भारतीय चौक्यांवर हल्ले करत आहे. काही तासांपूर्वीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कुपवाडामध्ये माछिल सेक्टरमध्ये भारताचा एक जवान शहीद झाला. या दहशतवाद्यांनी भारतीय जवानाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत नियंत्रण रेषेजवळ फेकला होता. त्यानंतर पळून जात असताना भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यातील एक दहशतवादी ठार झाला. आम्ही याला चोख प्रत्युत्तर देऊ, असंही भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
सीमारेषेजवळ गस्त घालणाऱ्या एका तुकडीवर पाकव्याप्त काश्मीरमधून रात्री नऊच्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात गस्तीवर असलेला शीख रेजिमेंटचा एक जवान शहीद झाला. गोळीबार करून दहशतवादी पलायन करत असताना भारतीय सैनिकांच्या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. भारतानं या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत दहशतवाद्याला यमसदनी धाडलं. काल देखील पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या आडून भारतावर गोळीबार केला होता. गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता.
दरम्यान, काल केलेल्या गोळीबारात भारतानं पाकिस्तानच्या 15 रेंजर्सना यमसदनी धाडलं. गुरुवारपासून जम्मू काश्मीरातील ५ सेक्टर्समध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानातील शकरगढमध्ये तैनात पाकिस्तानच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं. सीमा न ओलांडता भारतीय सैन्यानं जम्मू-काश्मीरच्या सांबामधून शकरगढवर हल्ला चढवून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून आतापर्यंत 56 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. मात्र, भारतानं देखील प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख उत्तर दिलं आहे.