भारताचं मोठं पाऊल! हवामान खात्याकडून आता पाकव्याप्त काश्मीरचाही अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:48 AM2020-05-08T00:48:58+5:302020-05-08T07:09:14+5:30
गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्रांच्या कक्षेत
नवी दिल्ली : भारतीयहवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राने पाकव्याप्त काश्मीरलाही आपल्या हवामान अंदाजात समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे आता पाकव्याप्त काश्मीरमधील हवामानाचा अंदाजही हवामान खात्याकडून जारी केला जात आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद या प्रदेशांतील हवामानाचा अंदाज देणे भारतीय हवामान खात्याने सुरू केले आहे. जम्मू-काश्मीर हवामान विज्ञान उपविभागानुसार ५ मेपासून या भागांचा अंदाज दिला जात आहे.
हवामान खात्याचे महासंचालक एम. महापात्र यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरच्या दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आले. तेव्हापासून या भागांचा उल्लेख ‘पीओके’ असा केला जात होता. आता या भागांचा उल्लेख जम्मू-काश्मीर उपविभाग असा केला जात आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील या शहरांचा उल्लेख वायव्य विभागाच्या सर्व हवामान अंदाजात केला जात आहे. वायव्य विभागात नऊ उपविभाग येतात. त्यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली-चंदीगढ हरियाणा, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान यांचा समावेश आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याच्या पाकच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण बनले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने या प्रदेशावर आपला दावा पुन्हा केला आहे.
पीओके भारताचा अविभाज्य भाग
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त होते. पाकव्याप्त काश्मिरात गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद यांचा समावेश आहे. गिलगिट-बाल्टिस्तानात निवडणूक घेण्याची परवानगी पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या भागाचा हवामान अंदाज देण्यास भारतीय हवामान खात्याला परवानगी देण्यात आली.
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. गिलगिट-बाल्टिस्तान पाकिस्तानने रिकामे करावे, असे भारतीय लष्करानेही सुनावले होते. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, पीओकेतहत या शहरांसाठी दैनिक राष्ट्रीय हवामान बुलेटिन जारी केले जाते. त्यामुळे त्याचा प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्रात समावेश होणे आवश्यक होते.