सिगारेटच्या वादावरून अमेरिकेत भारतीयाची हत्या
By Admin | Published: May 7, 2017 10:48 AM2017-05-07T10:48:02+5:302017-05-07T10:48:02+5:30
अमेरिकेच्या मोडेस्टो शहरात एका 32 वर्षीय भारतीय नागरिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे .
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. 7 - अमेरिकेच्या मोडेस्टो शहरात एका 32 वर्षीय भारतीय नागरिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे . जगजीत सिंग यांची हत्या सिगारेटवरून झालेल्या वादातून झाल्याचं समोर येत आहे. पंजाबच्या कपूरथला येथील रहिवासी जगजीत गुरुवारी रात्री आपले दुकान बंद करत असताना त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. जवळपास वर्षभरापूर्वी जगजीत अमेरिकेला गेले होते.
जगजीत हे जवळपास 9 तास मृत्युशी झुंज देत होते पण उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला. सिंग यांचे मेव्हणे के. एस. चीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सिंग यांच्या दुकानात एक ग्राहक सिगारेट घेण्यासाठी आला. सिंग यांनी नियमानुसार त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली, पण त्याने दाखवलेले ओळखपत्र अयोग्य असल्याने दोघांमध्ये वादावादी झाली आणि तो ग्राहक निघून गेला. त्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास जगजीत सिंग दुकान बंद करत असताना एका अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार केले. 9 तास मृत्युशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला.
यापुर्वी सिलिकॉन व्हॅलीत भारतीय वंशाच्या आयटी तंत्रज्ञाची आणि त्याच्या पत्नीची हत्या गोळ्या घालून हत्या कऱण्यात आली. नरेन प्रभू असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांची आणि त्यांच्या पत्नीची राहत्या घरातच हत्या करण्यात आली. मिर्जा ततलिक असं हल्लेखोराचं नाव असून हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी नरेन यांच्या मुलीचे आणि हल्लेखोर आरोपीचे प्रेम प्रकरण होते. मात्र, त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. त्यातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. नरेन यांच्या 20 वर्षीय मुलाने पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली .