भारतीय आहे, भारतातच मरेन !
By admin | Published: January 14, 2016 01:47 AM2016-01-14T01:47:58+5:302016-01-14T01:47:58+5:30
मी ज्यू आहे, पण सर्वार्थाने भारतीय आहे आणि भारतातच मला मृत्यू येईल,’ असे ठणकावून सांगणाऱ्या आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या
नवी दिल्ली : ‘मी ज्यू आहे, पण सर्वार्थाने भारतीय आहे आणि भारतातच मला मृत्यू येईल,’ असे ठणकावून सांगणाऱ्या आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ले. जे.(नि़) जेएफआर जेकब यांनी आज वयाच्या ९३व्या वर्षी नवी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. दुसरे महायुद्ध, १९६५ आणि १९७१च्या युद्धात जेकब यांनी आपले युद्धकौशल्य सर्व जगाला दाखवून दिले होेते.
३६ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीमुळे, अतुलनीय पराक्रमी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची ओळख होतीच; त्याहून निवृत्तीनंतर त्यांनी गोवा आणि पंजाब या राज्यांचे राज्यपालपद भूषविल्यामुळे ते
विशेष प्रसिद्ध होते. जेकब यांचे पूर्ण नाव जेकब फर्ज राफेल जेकब असे
होते. त्यांचा जन्म १९२३ साली कोलकात्यातील एका बगदादी ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण दार्जिलिंग येथील शाळेत झाले.
लहानपणापासूनच त्यांच्यावर सिगफ्राइड ससून, विल्फेड
ओवेन, ज्युलियन ग्रेनफेल अशा कवींचा प्रभाव होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर आणि नाझी फौजांनी ज्यूंवर केलेल्या अत्याचाराच्या व होलोकास्टच्या भयानक कथा त्यांच्या कानावर पडत होत्या. त्यामुळे बालपणातच नाझींविरोधात लढण्याचा जेकब यांनी निश्चय केला होता.
‘जोय बांगला’
1971 साली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या जेएफआर जेकब यांचा २०१२ साली बांगलादेशने कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यावर त्यांनी बांगला नागरिकांकडे पाहून हात उंचावून 'जोय बांगला' अशी घोषणा दिली. आणि खचाखच भरलेल्या वंगबंधू इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमधील नागरिकांनी क्षणार्धात उच्चरवात 'जोय बांगला' अशीच घोषणा करून त्यांना प्रतिसाद दिला.
लष्करी कारकीर्द !
१९४२ साली जेकब यांनी महू येथील आफीसर्स ट्रेनिंग स्कूलमधून लष्करी शिक्षण पूर्ण केले. तसेच अमेरिका व इंग्लंड येथेही त्यांनी लष्करी शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी इराक तसेच ब्रह्मदेश, सुमात्रा येथे लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतला.
१९६३ साली ते ब्रिगेडीयर झाले, तर १९६७ साली त्यांना मेजर जनरलपदी पदोन्नती मिळाली. १९६५ च्या युद्धात त्यांनी राजस्थान येथे उत्तम कामगिरी बजावली होती.
१९६९ साली त्यांची जनरल सॅम माणेकशा यांनी ईस्टर्न कमांडच्या चिफ आॅफ आर्मी स्टाफपदी नियुक्ती केली. मणिपूर, नागालँडमधील बंडखोरांशी लढण्यामध्येही त्यांचा सहभाग होता. भारत सरकारने त्यांचा परमविशिष्ट सेवा पदकाने गौरव केला होता.
बांगलादेश युद्ध...
जेकब यांच्या कारकीर्दीचा उच्चबिंदू म्हणजे बांगलादेश युद्धातील त्यांची कामगिरी. या युद्धामुळेच जेकब यांना विशेष ओळख मिळाली. युद्धकौशल्याच्या जोरावर केवळ तीन हजार भारतीय सैनिकांच्या मदतीने त्यांनी ढाक्याला स्वतंत्र केले.
पाकिस्तानचे त्याच शहरात २६, ४०० सैनिक उपस्थित असूनही हा विजय त्यांनी मिळविल्यामुळे सर्व जगाने आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे ए.ए.के. नियाझी यांनी शरणागती पत्करली आणि पाकिस्तानचे ९०,००० सैनिकही शरण आले. (जेकब यांनी आपल्याला ब्लॅकमेल केले, असा आरोपही नियाझी यांनी नंतर केला.)
भारत आणि इस्रायल यांच्यामधील संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी जेकब प्रयत्नशील होते. त्यांचे बांगलादेश युद्धावरील ‘बांगलादेश स्ट्रगल- अॅन ओडेसी इन वॉर पीस, सरेंडर अॅट ढाका’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
१९९८ ते १९९९ या वर्षभराच्या कालावधीसाठी ते गोव्याचे व त्यानंतर २००३ पर्यंत ते पंजाबचे राज्यपाल होते. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, ले. ज. जगजीतसिंह अरोरा आणि आता ले. जे. जेएफआर जेकब यांच्या निधनामुळे १९७१ सालच्या युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या आणखी एका महान सेनानीस भारत मुकला आहे, असे म्हणावे लागेल.