भारतीय नौदलाचं मोठं ऑपरेशन; INS सुमित्राने 19 पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाज वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 10:27 IST2024-01-30T10:19:05+5:302024-01-30T10:27:05+5:30
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या युद्धनौकेने अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

फोटो - Indian Navy
अरबी समुद्रात भारतीय नौदलाचं वर्चस्व दिसून येतं. भारतीय युद्धनौका INS सुमित्रा यांनी सोमवारी एडनच्या आखातात सोमाली चाच्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि 19 पाकिस्तानी नागरिकांसह एका इराणी जहाजाला वाचवलं आहे. या लोकांनी मासेमारी करणाऱ्यांच्या जहाजाचं अपहरण केलं होतं. रविवारी जहाजातून इमर्जन्सी कॉल आला. यानंतर युद्धनौकेने चाचेगिरीविरोधी मोहीम सुरू केली आणि मोठं यश मिळवलं.
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या युद्धनौकेने अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला आहे. 19 पाकिस्तानी नागरिकांसह एका जहाजाची कोचीच्या किनाऱ्यावर सुटका करण्यात आली आहे. 28 जानेवारी रोजी इराणी ध्वज असलेल्या मासेमारी जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय युद्धनौका INS सुमित्राने पुढाकार घेतला.
सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ सोमाली चाच्यांनी अपहरण केलेल्या 19 पाकिस्तानी नागरिकांना घेऊन गेलेल्या जहाजाची सुटका केली. भारतीय नौदलाने 24 तासांत अरबी समुद्रात अपहरणाचे दोन मोठे प्रयत्न हाणून पाडले आहेत. 28-29 जानेवारीला समुद्री चाच्यांनी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडेच भारतीय नौदलाने एडनच्या आखातात तीन युद्धनौका पाठवल्या आहेत.