गुलामीचं निशाण आज खाली उतरलं, नौदलाचं नवं निशाण शिवरायांना समर्पित; PM मोदींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 11:02 AM2022-09-02T11:02:40+5:302022-09-02T11:05:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी आयएनएस विक्रांत हे युद्धवाहू जहाज आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं.
कोची-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी आयएनएस विक्रांत हे युद्धवाहू जहाज आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं. आयएनएस विक्रांत हे भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे जहाज ठरणार आहे. आयएनएस विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींच्या हस्ते यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचंही अनावरण करण्यात आलं. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचं मोदींनी म्हटलं.
नौदलाच्या नव्या निशाणावरुन आता सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आलं आहे. नव्या निशाणात डाव्या बाजूस तिरंगा आणि उजव्या बाजूस निळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर सोनेरी रंगात अशोक चिन्ह साकारण्यात आलेलं आहे. त्याखाली संस्कृत भाषेत 'शं नो वरुण:' असं लिहीण्यात आलं आहे.
The new Naval Ensign was unveiled by PM today, during the commissioning of #INSVikrant, the first indigenously built Indian Aircraft Carrier and thus, an apt day for heralding the change of ensign. INS Vikrant will adorn the new White ensign with effect from its commissioning. pic.twitter.com/OxEJ2mQXfo
— ANI (@ANI) September 2, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक दिवशी इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे ओझे उतरवले आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात डौलानं फडकणार आहे.
इंग्रजांनी भारतीय जहाजांवर घातले होते निर्बंध
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी शक्तीच्या बळावर असं नौदल उभारलं की ज्यामुळे शत्रूंची झोप उडाली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणारा व्यापार याची भीती वाटायची. म्हणूनच त्यांनी भारताच्या सागरी शक्तीचे कंबरडे मोडण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी ब्रिटीश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापार्यांवर किती कडक निर्बंध लादले गेले याचा इतिहास साक्षीदार आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
'विक्रांत'वर महिलांनाही स्थान
"जेव्हा विक्रांत देशाच्या सागरी क्षेत्राच्या रक्षणासाठी उतरेल तेव्हा नौदलाच्या अनेक महिला सैनिकही जहाजावर तैनात असतील. महासागराच्या अफाट शक्तीने, अमर्याद स्त्री शक्तीने ती नव्या भारताची उदात्त ओळख बनत आहे. आता भारतीय नौदलाने महिलांसाठी आपल्या सर्व शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. जे निर्बंध होते ते आता हटवले जात आहेत. ज्याप्रमाणे समर्थ लहरींना सीमा नसतात, त्याचप्रमाणे भारतातील महिलांनाही आता कोणत्याही सीमा किंवा बंधनं नाहीत. थेंब थेंब पाण्यानं अथांग महासागर बनतो. त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक नागरिकाने 'वोकल फॉर लोकल' हा मंत्र जगायला सुरुवात केली तर देश स्वावलंबी व्हायला फारसा वेळ लागणार नाही", असं मोदी म्हणाले.