भारतीय नौदलाने २७ जणांना वाचवले
By admin | Published: June 1, 2017 01:12 AM2017-06-01T01:12:19+5:302017-06-01T01:12:19+5:30
मोरा वादळाने बांगलादेशला झोडपून काढल्यानंतर भारतीय नौदलाने तेथे केलेल्या मोठ्या बचाव कार्यात २७ जणांना वाचवले. त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मोरा वादळाने बांगलादेशला झोडपून काढल्यानंतर भारतीय नौदलाने तेथे केलेल्या मोठ्या बचाव कार्यात २७ जणांना वाचवले. त्यात लहान मुले, वृद्ध आणि महिलांचा समावेश आहे.
मोरा वादळाने तेथे मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवला असून, लक्षावधी लोकांना बेघर केले आहे. नौदलाच्या सुमित्रा जहाजाने चित्तगाँगपासून १०० मैलांवर असलेल्या किनाऱ्यावर भरकटत आलेल्या २७ जणांना वाचवले, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले. बांगलादेशात बचाव मोहिमेसाठी ईस्टर्न नेव्हल कमांडने पी-८१ हे विमानही कामाला लावले होते.
अतिशय प्रतिकूल हवामानामुळे बचाव व मदत कार्यात मोठे अडथळे आले आहेत. बांगलादेशला मंगळवारी मोरा वादळाने झोडपून काढले, त्यात सहा जण ठार झाले. अनेक घरांची हानी त्याने केली. दहा जिल्ह्यांतील अडीच दशलक्ष लोक गंभीर वादळाच्या संकटात आहेत.
श्रीलंकेतील पुराच्या बळींची संख्या २०२
कोलंबो : श्रीलंकेतील पुरात बळी गेलेल्यांची संख्या बुधवारी २०२ झाली असून, ९४ लोक अजून बेपत्ता आहेत. २००३ नंतर प्रथमच एवढा मुसळधार पाऊस झाला व त्याने जवळपास पाच दशलक्ष लोकांना विस्थापित केले.
मिझोरामलाही फटका
ऐझवाल : ‘मोरा’ वादळामुळे आलेला जोरदार पाऊस आणि तुफानी वाऱ्यांनी मंगळवारी रात्री मिझोरामला झोडपून काढले असून, वीज पुरवठा, दूरसंचार व्यवस्था विस्कळीत झाली व दरडी कोसळल्या.