हिंदी महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका, भारतीय नौदलानं असं केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 12:47 IST2018-04-18T12:47:42+5:302018-04-18T12:47:42+5:30
जेव्हा हिंदी महासागरात चीनच्या तीन युद्धनौका दिसल्या. त्यावेळी भारतीय नौदलानंही त्यांचं हटके अंदाजात ट्विट करत स्वागत केलं.

हिंदी महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका, भारतीय नौदलानं असं केलं स्वागत
नवी दिल्ली- मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झालाय. डोकलामच्या मुद्द्यावरून हा तणाव पराकोटीला गेला होता. चीनबरोबर भारताचे राजनैतिक संबंधही फारसे चांगले नाहीत. अशात चीन सातत्यानं हिंदी महासागरात घुसखोरीचा प्रयत्न करत असतो. परंतु भारताकडूनही चीनला जशात तसे उत्तर मिळते.
मंगळवारी जेव्हा हिंदी महासागरात चीनच्या तीन युद्धनौका दिसल्या. त्यावेळी भारतीय नौदलानंही त्यांचं हटके अंदाजात ट्विट करत स्वागत केलं. हिंदी महासागरातल्या भारताच्या हद्दीत चीनच्या 29व्या पायरसी एस्कॉर्ट फोर्सचं स्वागत आहे, हॅपी हंटिंग, असं म्हणत बीजिंगला भारतानं मोठा संदेश दिला आहे. भारतीय नौदलानं केलेल्या स्वागतानं चीनही काहीसा अचंबित झाला.
#MaritimeDomainAwareness@indiannavy extends a warm welcome to the 29th Anti-Piracy Escort Force (APEF) of PLA(N) in Indian Ocean Region (IOR). Happy Hunting @SpokespersonMoD@DefenceMinIndia@IAF_MCC@adgpi@IndiaCoastGuard@IndianDiplomacypic.twitter.com/7NTW4TwQuW
— SpokespersonNavy (@indiannavy) April 17, 2018
गेल्या काही दिवसांपासून चीन हिंदी महासागरात स्वतःचा दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय नौदलानं चीनच्या युद्धनौकांना ज्या प्रकारे पकडलं, त्यावरून स्पष्ट होतंय की चीन हिंदी महासागरातही स्वतःचं प्रभुत्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. समुद्रीचाच्यांना कंठस्नान घालण्यासाठी चीनच्या युद्धनौका हिंदी महासागरातून ब-याचदा आफ्रिकेतल्या जिबुती आणि पाकिस्तानतल्या ग्वादार, कराची येथे ये-जा करत असतात. चीननं सामरिक विषयांवरून शेजारच्या देशांसोबत नेहमी वाद ओढवून घेतलाय. चिनी नौसेनेनं गेल्या काही दिवसांपूर्वी एक पत्रिका काढली होती. त्यात चीनच्या हिंदी महासागरातल्या रणनीतीचाही उल्लेख होता. त्या पत्रिकेत म्हटलं होतं की, स्थानिक निवडणुकांदरम्यान सतर्कता बाळगा, तसेच सहका-याच्या हालचालींवर नजर ठेवा. हळूहळू दुस-या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करा. चीननं ब-याचदा भारतातल्या अरुणाचल प्रदेश, डोकलाम, उत्तराखंड सीमेजवळ घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेची भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण स्थिती होती.