भारतीय अधिकाऱ्यांचा पाकमध्ये छळ; शीख भाविकांना भेटू न दिल्याबद्दल नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:45 AM2018-11-24T05:45:20+5:302018-11-24T05:45:57+5:30
भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाºयांचा छळ केल्याबद्दल, तसेच पाकिस्तानमध्ये आलेल्या भारतीय शीख भाविकांना भेटण्यास या अधिका-यांना परवानगी नाकारल्याबद्दल भारताने तीव्र निषेध नोंदविला आहे.
नवी दिल्ली : भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाºयांचा छळ केल्याबद्दल, तसेच पाकिस्तानमध्ये आलेल्या भारतीय शीख भाविकांना भेटण्यास या अधिका-यांना परवानगी नाकारल्याबद्दल भारताने तीव्र निषेध नोंदविला आहे.
पाकिस्तानात असलेल्या नानकाना साहिब, सच्चा सौदा या दोन गुरुद्वारांना भारतातील शेकडो शीख भाविकांनी गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त २१ व २२ नोव्हेंबर रोजी भेट दिली. त्यावेळी या भाविकांची भेट घेण्यास भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाºयांना पाकिस्तानने परवानगी नाकारली. या अधिका-यांना दोन्ही गुरुद्वारांत जाण्याची पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने परवानगी दिलेली असूनही त्यांच्याशी असे वर्तन करण्यात आले. पाकिस्तानला गेलेल्या शीख भाविकांसमोर खलिस्तानला पाठिंबा देणारे फलकही मुद्दाम झळकविल्याचे वृत्त आहे.
आयएसआयची कारस्थाने
पंजाबमध्ये निरंकारी भवनावर नुकत्याच झालेल्या बॉम्बहल्ल्यात तीन जण ठार व काही जण जखमी झाले होते. या हल्लेखोरांनी पाकिस्तानमध्ये बनविलेल्या बॉम्बचा वापर केला होता. या हल्ल्याला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा पाठिंबा होता, हे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवायांनी पुन्हा जोर धरावा, म्हणून आयएसआय करीत असलेली कारस्थाने लपून राहिलेली नाहीत.