भारतीय तेलवाहू जहाज बेपत्ता, सागरी चाच्यांनी अपहरण केल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 05:12 AM2018-02-05T05:12:02+5:302018-02-05T05:12:23+5:30
पनामामध्ये नोंदणी केलेले व मुंबईतील अँग्लो इंडियन शिपिंग कंपनीच्या मालकीचे ‘एमटी मरिन एक्स्प्रेस’ हे तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेच्या किना-यालगतच्या गिनीच्या आखातातून गेले तीन दिवस बेपत्ता झाले.
नवी दिल्ली/मुंबई : पनामामध्ये नोंदणी केलेले व मुंबईतील अँग्लो इंडियन शिपिंग कंपनीच्या मालकीचे ‘एमटी मरिन एक्स्प्रेस’ हे तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेच्या किना-यालगतच्या गिनीच्या आखातातून गेले तीन दिवस बेपत्ता झाले असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
या जहाजावर १३,५०० टन गॅसोलिन होते व त्यावर २२ भारतीय कर्मचारी होते. पश्चिम आफ्रिकेतील बेनिन देशातील कॉटॉनू बंदरात नांगर टाकून उभे असताना या जहाजाशी गुरुवारी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे जहाज बेपत्ता झाले. जहाजाच्या कंपनीने घटनेची माहिती नौकानयन महासंचालनालयास दिली व मदतीची विनंती केली.
जहाजावरील कर्मचाºयांचा शोध घेणे व त्यांची सुखरूप सुटका करणे हे आमचे सर्वात अग्रक्रमाचे काम आहे. कर्मचाºयांच्या कुटुंबियांना त्यांच्या ख्यालीखुशालीची ताजी माहिती देण्यात येत आहे. पण जहाजाचा शोध अद्याप लागलेला नाही, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
>सर्व २२ कर्मचारी भारतीय आहेत. पण ते नेमके कुठले आहेत, याची माहिती समजू शकली नाही. दोन कर्मचारी केरळचे असल्याचे समजते. भारताच्या अबुजा येथील वकिलातीसही शोध आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे, असे परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी कळविले.
>नौकानयन संचालनालयाने परराष्ट्र मंत्रालयास कळविल्यावर त्यांनी जहाज जेथे संपर्कात होते, त्याच्या जवळच्या नायजेरिया व बेनिन या दोन्ही देशांमधील संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून त्यांना जहाजाचा शोध घेण्याची विनंती केली.
>‘त्या’ सागरी मार्गावरील जहाजांना सावधानतेचा इशारा
कदाचित या जहाजाचे चाच्यांनी अपहरण केल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गेल्या महिनाभरात अन्य दोन जहाजांचे चाच्यांनी अपहरण केले होते. त्या सागरी मार्गावरील सर्व जहाजांना सावध करण्यात आले असून, या बेपत्ता जहाजाचा सुगावा लागला तर त्यांनी ती माहिती लंडन येथील आंतरराष्ट्रीय सागरी चाचेगिरीविरोधी यंत्रणेच्या मुख्यालयास कळवावे, असा संदेश नायजेरियाने पाठविला आहे.