"मणिपूरमधील लढाई थांबवा, माझ्या घराला वाचवा", मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:18 PM2023-07-18T12:18:25+5:302023-07-18T12:19:07+5:30
Mirabai Chanu Appeals to PM Modi : मीराबाई चानू हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांना भावनिक साद घातली आहे.
mirabai chanu manipur violence : मागील जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीने होरपळत आहे. राज्यातील हिंसाचार रोखण्यात अयशस्वी ठरलेले मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील मागील काही काळात सुरू होती. मात्र, नंतर त्या चर्चांना पूर्णविराम देत आंदोलक महिलांनी नाट्यमय घडामोडींना आमंत्रण देत राजीनामा फाडला. पण, आजतागायत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे व्यथित होऊन ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकणारी मिराबाई चानू हिने पंतप्रधाननरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांना भावनिक साद घातली आहे.
वेटलिफ्टर मीराबाई चानूने एक व्हिडीओ शेअर करत मणिपूरमधील हिंसाचार रोखण्याचे आवाहन केले आहे. "मणिपूरमधील जातीय संघर्षामुळे अनेक खेळाडू प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत आणि मुलांच्या शिक्षणावरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मोठ्या संख्येने लोकांना जीव गमवावा लागला. अनेकांची घरे जाळली, मणिपूरमध्ये माझे देखील घर आहे. आता मी राज्यात नाही, मी आता अमेरिकेत असून जागतिक चॅम्पियनशिप आणि आशियाई गेम्ससाठी तयारी करत आहे. मी मणिपूरमध्ये नसले तरी हा संघर्ष कधी संपेल असा प्रश्न मला नेहमी पडतो", असे मीराबाई चानूने म्हटले आहे.
I request Hon'ble Prime Minister @narendramodi_in sir and Home Minister @AmitShah sir to kindly help and save our state Manipur. 🙏🙏 pic.twitter.com/zRbltnjKl8
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 17, 2023
मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक साद
व्हिडीओ शेअर करताना मीराबाई चानूने पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे. सरकारला आवाहन करताना तिने म्हटले, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन करते की, त्यांनी आमच्या मणिपूर राज्याला वाचवावे."
दरम्यान, मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.