देवदूत बनले डॉक्टर, हजारो फूट उंचीवर वाचविले प्राण; ५ तास मृत्यूशी झुंज, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:57 AM2023-01-09T10:57:01+5:302023-01-09T10:57:36+5:30
एअर इंडियाच्या विमानातील घटना, आला होता हार्ट अटॅक
नवी दिल्ली : जमिनीपासून हजारो मीटर उंच आकाशात उडत असलेल्या विमानात अचानक एका प्रवाशाची प्रकृती खालावते. त्यावेळी एक डॉक्टर देवदूतासारखे धावून येतात आणि त्याचे प्राण वाचवतात. एखाद्या चित्रपटाला शोभेसा हा प्रसंग घडला आहे लंडन येथून नवी दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात. भारतीय वंशाचे डॉ. विश्वराज वेमाला यांनी या प्रवाशाला एकदा नव्हे तर दोन वेळा विमानातच जीवनदान दिले.
स्वतः डॉ. वेमाला यांनी बर्मिंगहॅम येथून भारतात येणाऱ्या विमानात घडलेला हा प्रसंग शेअर केला आहे. डॉ. वेमाला हे यकृत विशेषज्ञ आहेत. ते आईसोबत भारताकडे येण्यासाठी प्रवास करत होते. प्रवासात एका ४३ वर्षीय प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर आहे का, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी प्रवाशाचा श्वास आणि नाडीचे ठोके थांबलेले होते. सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर रुग्णाचा श्वास परला. विशेष म्हणजे, हार्टरेट मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर, ग्लुकोज मीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर ही उपकरणे विमानातील प्रवाशांकडेच मिळाली.
५ तास मृत्यूशी झुंज
या रुग्णाला दुसरा हार्ट अटॅक आला. त्यावेळी पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्याला जिवंत ठेवण्यासाठी सुमारे पाच तास शर्थीचे प्रयत्न केले. वैमानिकाने मुंबईत आपत्कालीन लैंडिंगची परवानगी मिळविली. विमानातील आपत्कालीन वैद्यकीय किटमध्ये लाइफ सपोर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचाही समावेश होता.
वैद्यकीय प्रशिक्षणादरम्यान हार्ट अटॅकसारख्या परिस्थितीमध्ये उपचार कसे करावेत, याचा अनुभव होता. मात्र, आकाशात ४० हजार फूट उंचीवर विमानात हा पहिलाच अनुभव होता. गेल्या अनेक वर्षांमध्ये माझ्या आईने मला प्रथमच कोणावर उपचार करताना पाहिले. त्यामुळे हा अविस्मरणीय अनुभव होता. - डॉ. विश्वराज वेमाला, यकृत विशेषज्ञ