...अन् मातापित्यांनी फेसबुकवर अंत्यविधी पाहून मुलाला दिला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:42 AM2020-04-19T02:42:10+5:302020-04-19T06:58:17+5:30
केरळमध्ये होत असलेल्या अंत्यसंस्कारांचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण पाहून साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप
तिरुवनंतपुरम : शारजाह येथे राहात असलेल्या एका मात्या-पित्याने आपल्या मुलाच्या पार्थिवावर केरळमध्ये होत असलेल्या अंत्यसंस्कारांचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण पाहून साश्रुपूर्ण नयनांनी त्याला अखेरचा निरोप दिला. मृताचे नाव ज्यूएल जी. जोमे असे असून, तो शारजा येथील एका शाळेत दहावीमध्ये शिकत होता. त्याचे आई-वडील केरळचे मूळ रहिवासी असून, नोकरी व्यवसायानिमित्त शारजाह येथे स्थायिक झाले आहेत.
ज्यूएल ७ वर्षांपासून कर्करोगाने आजारी होता. प्रकृती बिघडल्याने त्याला दुबईतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर दोन आठवडे उपचार सुरू होते. त्याच्या पार्थिवावर केरळमध्ये मूळ गावीच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी त्याचे मातापिता व दोन भावांचीही इच्छा होती. त्यानुसार संयुक्त अरब अमिराती सरकारची बऱ्याच प्रयत्नानंतर परवानगी मिळवून ज्यूएलचे पार्थिव केरळला पाठविण्यात आले. मात्र कोरोनाच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक बंद असल्याने ज्यूएलच्या मातापित्यांना व भावांना केरळमध्ये जाता आले नाही.