अभिनंदन यांच्याकडून पाकने स्वत:चे करून घेतले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 05:53 AM2019-03-03T05:53:10+5:302019-03-03T05:53:31+5:30
विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याची वेळ पाकिस्तानने दोनदा पुढे ढकलली, कारण पाक अधिकाऱ्यांना त्यांच्या जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता, असे उघड झाले आहे.
नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याची वेळ पाकिस्तानने दोनदा पुढे ढकलली, कारण पाक अधिकाऱ्यांना त्यांच्या जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता, असे उघड झाले आहे. आपली बाजू आंतराष्ट्रीय समुदायासमोर मांडता यावी, यासाठी पाककडून हे चित्रिकरण करण्यात आले.
त्यांना ताब्यात देण्याआधी पाकने घाणेरडे राजकारण केले केले. भारतीय प्रसारमाध्यमे कशा अफवा पसरवतात यावर त्यांना भाष्य करायला लावले. पाकिस्तानने १ मिनिट २४ सेकंदांचा हा व्हिडिओ सुटकेआधी स्थानिक प्रसार माध्यमांना दिला. एवढ्या लहान व्हिडीओमध्ये १७ कट्स केले आहेत.
अभिनंदन यांना तीन दिवसांतील घटनाक्रम सांगण्यास भाग पाडले. पाक हवाई हद्दीमध्ये मी लक्ष्य शोधण्याचा प्रयत्नात आलो असताना, पाकच्या विमानांनी माझे विमान पाडताच मी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. तिथे खूप लोक जमले होते. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मी पिस्तूल टाकून पळू लागलो. तेव्हा दोन पाकिस्तानी जवानांनी मला वाचवले. त्यात पाकिस्तानी लष्कराचे एक कॅप्टनही होते. त्यांनी मला लष्कराच्या युनिटमध्ये नेऊन प्रथमोपचार केले. त्यानंतर रुग्णालयात उपचारांसाठी नेले, असे अभिनंदन म्हणाल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसते.
पाकिस्तानी लष्कर व्यावसायिक असून, त्यांच्यासह माझा वेळ चांगला गेला. भारतीय प्रसारमाध्यमे छोट्या बाबी निष्कारण वाढवून सांगतात व लोकांना भडकावतात, असे त्यांच्याकडून वदवून घेण्यात आल्याचे या व्हिडीओमधून दिसते. ते कागदावर लिहिलेला मजकूर वाचून दाखवत असल्याचे जाणवते. त्यांच्याकडून काय वदवून घ्यायचे, हे पाकने ठरवले होते. पाकचे गुणगान व भारतीय प्रसारमाध्यमांवरील टीका हे लिहून दिले होते व ते वाचायला लावले, असे व्हिडीओ पाहताना जाणवते. पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांचे लगेच बोगस खोटे ट्विटर अकाऊंटही उघडले आणि त्यांची काही वक्तव्ये त्यावर पोस्ट केली. हे अकाऊंट त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी उघडण्यात आले आहे. त्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या वायफायचा उपयोग करण्यात आला.