‘इसिस’चे भारतीय हस्तक ‘लो प्रोफाईल’
By admin | Published: April 22, 2016 03:09 AM2016-04-22T03:09:34+5:302016-04-22T03:09:34+5:30
इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने भारतातील आपल्या हस्तकांना काही काळ ‘लो प्रोफाईल’ राहण्याचा सल्ला दिला आहे
नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने भारतातील आपल्या हस्तकांना काही काळ ‘लो प्रोफाईल’ राहण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या जानेवारीत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबईत राहणारा इंजिनिअर मुदब्बिर मुश्ताक शेख याच्या नेतृत्वात चालविण्यात येणाऱ्या इसिस प्रभावित गटांच्या कारवाया चिरडून काढण्यासाठी देशाच्या अनेक भागात व्यापक धरपकड मोहीम राबविली होती. एनआयएच्या सक्रियतेमुळे इसिसचे म्होरके धास्तावले असून त्यांनी भारतातील आपल्या हस्तकांना सतर्क राहण्यासोबतच काही काळ शांत राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसमध्ये दहशतवाद्यांची भरती करणारा शफी अरमर ऊर्फ युसूफ अल हिंदी याने भारतातील त्याच्या साथीदारांना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमाने संपर्कात राहणाऱ्यांसोबत सक्रियता कमी करण्यास सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)इसिसमध्ये सामील होण्यासाठी इराक आणि सिरियाला जाणाऱ्या तरुणांचा शोध व त्यांच्यात कट्टरवादाचे बीज पेरण्यासाठी या संघटनेचे म्होरके इंटरनेट आणि सोशल मीडियाचाच मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नाहीतर भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यासाठीही दहशतवादी इंटरनेटचा वापर करतात. हे लक्षात आल्यानंतर एनआयएने गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेट व सोशल मीडियावर कडक पाळत ठेवली आहे. विदेशातील इसिसचे म्होरके आणि भारतीय तरुणांमधील आॅनलाईन संपर्क कमी झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, असे गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.