Indian Railway: बिहारमध्ये चक्क रेल्वे ट्रॅक चोरीला, तब्बल दोन किमीच्या ट्रॅकवर चोरट्यांचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 07:58 AM2023-02-06T07:58:18+5:302023-02-06T07:58:37+5:30
Indian Railway: तब्बल दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रेल्वेमार्गच चोरीला गेल्याची माहिती समोर येताच विभागीय रेल्वे व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे.
पाटणा - बिहारमधील समस्तीपूर रेल्वे मंडळामध्ये इंजिनाच्या स्क्रॅपला विकण्याचा प्रकार समोर आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पंडोल येथून लोहट साखऱ कारखान्याकडे गेलेल्या रेल्वेमार्गातील दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रेल्वेमार्गच चोरीला गेल्याची माहिती समोर येताच विभागीय रेल्वे व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे.
रेल्वेने या प्रकरणातील झंझारपूरच्या आऊटपोस्टचे प्रभारी आणि मधुबनीच्या जमादाराला निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
समस्तीपूर रेल्वे विभागातील पंडोल स्टेशनमधून लोहट साखर कारखान्यासाठी अनेक वर्षांपूर्वी पूर्व मध्य रेल्वेने लोहमार्ग बांधला होता. हा साखर कारखराना बंद झाल्यानंतर या मार्गावरून रेल्वे गाड्यांची ये जा बंद झाली होती. या रेल्वे मार्गाचे स्क्रॅप म्हणून लिलाव करण्यात येणार होते. मात्र या लिलावापूर्वीच पंडोल स्टेशनवरून लोहट साखर कारखान्यापर्यंत जाणारा दोन किमीपर्यंतचा मार्ग चोरी झाला आहे.
दरम्यान, काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी कटकारस्थान रचून रेल्वे मार्गावरील स्क्रॅप गायब केल्याचा आरोप लोकांनी केले आहे. प्राथमिक तपासानंतर आरपीएफ कमांडेंट एसजे ए जानी यांनी झंझारपूर स्टेशनचे आऊटपोस्ट प्रभारी श्रीनिवास आणि मधुबनी स्टेशनवर तैनात असलेले आरपीएफ जमादार मुकेश कुमार सिंह यांना निलंबित केले आहे. आरपीएफने दरभंगामध्ये रेल्वे मार्ग चोरी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
समस्तीपूर रेल्वे विभागाने दोन किमीपर्यंत स्क्रॅप रेल्वेमार्ग चोरीला गेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. रेल्वे व्हिजिलेंस (सीआयबी) आणि आरपीएफची टीम यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.