Indian Railway: भारतातील असं राज्य जिथे आहे केवळ एक रेल्वे स्टेशन, लाखो लोकांसाठी प्रवासाचा एकमेव पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:07 PM2023-03-09T14:07:13+5:302023-03-09T14:07:51+5:30
Indian Railway: देशातील प्रत्येक कोपऱ्यात भारतीय रेल्वेचं नेटवर्क पोहोचलेलं आहे. मात्र असं असलं तरी भारतात असं एक राज्य आहे जिथे केवळ एकच रेल्वे स्टेशन आहे.
भारतीय रेल्वे जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. दररोज भारतीय रेल्वेमधून लाखो लोक प्रवास करत असतात. तर मालगाड्या दररोज ३३ लाख टन मालाची ने आण करतात. भारतीय रेल्वेच्या नावावर अनेक विक्रम नोंदवलेलेल आहेत. देशातील प्रत्येक कोपऱ्यात भारतीय रेल्वेचं नेटवर्क पोहोचलेलं आहे. मात्र असं असलं तरी भारतात असं एक राज्य आहे जिथे केवळ एकच रेल्वे स्टेशन आहे. ज्या देशात तब्बल ८ हजारांहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत, अशा देशात केवळ एकच रेल्वे स्टेशन असलेलं राज्य असावं, ही बाब आश्चर्यकारक आहे.
या राज्याचं नाव आहे मिझोराम. मिझोरामची लोकसंख्या सुमारे ११ लाख एवढी आहे. मात्र येथे केवळ एकच रेल्वे स्टेशन आहे. तसेच संपूर्ण राज्यातील लोक हे ये जा करण्यासाठी याच राज्यावर अवलंबून आहेत. या स्टेशनचं नाव आहे बइराबी. हे स्टेशन मिझोराममधील कोलासिब जिल्ह्यात आहे. या स्टेशनवरून प्रवाशांच्या येण्याजाण्याबरोबरच मालाची ने आण करण्याचं काम केलं जातं. आधी हे स्टेशन खूप लहान होते. मात्र २०१६ मध्ये ते विकसित करण्यात आले. या स्टेशनवर तीन प्लॅटफॉर्म आणि चार ट्रॅक आहेत.
राज्यात केवळ एकच रेल्वे स्टेशन असल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याच काळापासून येथे दुसरे स्टेशन उभारण्याची मागणी केली जात आहे. रेल्वेकडून राज्यात आणखी एक स्टेशन उभे करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच या स्टेशनवरून रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक उत्तम करण्याचीही योजना आहे.