निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार पुन्हा देणार नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 12:30 PM2018-06-20T12:30:24+5:302018-06-20T12:30:24+5:30
भारतीय रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमी असल्याची बाब समोर आली आहे.
नवी दिल्ली- रेल्वेतून निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे मनुष्यबळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेणार आहे. भारतीय रेल्वेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांना रेल्वे पुन्हा रूजू करून घेणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमी असल्याची बाब समोर आली आहे. या मागणीला पूर्ण करण्यासाठी रेल्वे निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्याच्या तयारीत आहे. 1200 रूपये प्रती दिवस अशी रक्कम देऊन रेल्वेकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं जाणार आहे. कुठल्याही डिपार्टमेंट हेडकडे 10 माजी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याचे अधिकार आहेत.
नियुक्त रेल्वे स्टाफ विविध झोनमध्ये असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कामात मदत करेल. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमित नियुक्तीपेक्षा वेगळी असेल म्हणजेच सध्या अस्तित्वात असेलल्या रिकाम्या जागेवर हे कर्मचारी नसतील. रेल्वेतील रिकाम्या जागांवर नियुक्त्या आधीप्रमाणेच सुरू राहतील. निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेताना रेल्वेने दोन अटी घालून दिल्या आहेत.
दरम्यान, रेल्वेकडून सध्या मोठ्या प्रमाणात रूळांची दुरुस्ती व नवीन रूळ टाकण्याचं काम सुरू आहे. सोमवारी (18 जून) रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मोठी घोषणा केली. जर रविवारी रेल्वेला पाच-सहा तास उशिर होत असेल तर सर्व प्रवाशांना रेल्वेकडून मोफत जेवण दिलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.