देशात सर्वाधिक अंतर कापणारी ‘वंदे भारत’ धावली; कोणत्या राज्यात सेवा सुरु? पाहा, तिकीट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 12:17 PM2023-11-12T12:17:28+5:302023-11-12T12:18:19+5:30

Vande Bharat Express Festival Special Train: सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे.

indian railway longest special vande bharat express train has started between new delhi and patna know all about | देशात सर्वाधिक अंतर कापणारी ‘वंदे भारत’ धावली; कोणत्या राज्यात सेवा सुरु? पाहा, तिकीट दर

देशात सर्वाधिक अंतर कापणारी ‘वंदे भारत’ धावली; कोणत्या राज्यात सेवा सुरु? पाहा, तिकीट दर

Vande Bharat Express Festival Special Train: देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला ३४ वंदे भारत ट्रेन देशातील विविध राज्यांमध्ये चालवल्या जात आहेत. यातच आता दिवाळीसह आगामी सणासुदीच्या काळात अन्य सेवांप्रमाणे भारतीय रेल्वेने फेस्टिव्हल स्पेशल वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, सणासुदीच्या काळासाठी एक अशी वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जात आहे, जी देशातील सर्वाधिक अंतर कापणारी ट्रेन ठरली आहे. 

सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे विशेष वंदे भारत एक्सप्रेस चालवत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी देशाची राजधानी नवी दिल्ली ते बिहारची राजधानी पाटणापर्यंत वंदे भारत महोत्सव विशेष ट्रेन चालवत आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस नवी दिल्ली ते पाटणा जंक्शन दरम्यान धावते. नवी दिल्ली ते पाटणा यांमधील अंतर ९९४ किलोमीटर असून वंदे भारत एक्स्प्रेस हे अंतर केवळ १२ तासांत कापू शकते, असे सांगितले जात आहे. या विशेष वंदे भारत ट्रेनचे बुकिंगही सुरू झाले आहे.

देशात सर्वाधिक अंतर कापणारी ‘वंदे भारत’ धावली

नवी दिल्ली ते पाटणा या दरम्यान धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस हा देशातील सर्वाधिक अंतर असलेला मार्ग आहे. यापूर्वी नवी दिल्ली-वाराणसी दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सर्वाधिक अंतर असलेली ट्रेन होती. नवी दिल्ली ते वाराणसी हे ७७१ किमीचे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस ८ तासांत कापते. नवी दिल्ली-पाटणा वंदे भारत ट्रेनचा मार्ग यापेक्षाही अधिक अंतराचा आहे. ही वंदे भारत ट्रेन विशेष उद्देशाने चालवण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सध्या शताब्दी मार्गावर चालवल्या जात आहेत. या आर्थिक वर्षात स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे.

दरम्यान, ही ट्रेन नवी दिल्लीहून सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पाटणा येथे पोहोचेल. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी पाटणा जंक्शन येथून सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी वंदे भारत ट्रेन सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता नवी दिल्लीला पोहोचेल. नवी दिल्ली ते पाटणा या एससी चेअर कार कोचचे भाडे २३५५ रुपये आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ४४१० रुपये ठेवण्यात आले आहे.


 

Web Title: indian railway longest special vande bharat express train has started between new delhi and patna know all about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.