प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ५० नवीन अमृत भारत ट्रेन धावणार; अश्विनी वैष्णव यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 08:27 PM2024-02-20T20:27:26+5:302024-02-20T20:27:50+5:30

Amrit Bharat Express: आताच्या घडीला अमृत भारत ट्रेन दोन मार्गांवर चालवल्या जात असून, ५० अमृत भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे.

indian railway minister ashwini vaishnaw said approval for 50 more amrit bharat train | प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ५० नवीन अमृत भारत ट्रेन धावणार; अश्विनी वैष्णव यांची घोषणा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ५० नवीन अमृत भारत ट्रेन धावणार; अश्विनी वैष्णव यांची घोषणा

Amrit Bharat Express: आताच्या घडीला भारतीय रेल्वेत वंदे भारत एक्स्प्रेसची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नवनवीन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. सामान्य प्रवाशांना वंदे भारतचे तिकीट परवडत नाही, यासाठी भारतीय रेल्वेने अमृत भारत ट्रेन सुरू केली. सध्या दोन अमृत भारत ट्रेनची सेवा सुरू असून, आगामी काळात ५० नवीन मार्गांवर अमृत भारत ट्रेन सुरू होणार आहेत, या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. 

३० डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली ते दरभंगा व्हाया अयोध्या आणि मालदा ते बंगळुरू या दोन मार्गांवर पहिल्या दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. सुरुवातीला याला वंदे भारत साधारण ट्रेन असे संबोधले गेले. देशातील काही मार्गांवर या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. यानंतर या ट्रेनचे नामकरण अमृत भारत ट्रेन करण्यात आले. सामान्य प्रवाशांचा या अमृत भारत ट्रेनला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. 

अमृत भारत ट्रेनचे मोठे यश, ५० नवीन मार्गांवर मंजुरी

विद्यमान अमृत भारत ट्रेनला मोठे यश मिळाले आहे. म्हणूनच आता ५० अमृत भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करताना म्हटले आहे. तसेच या पोस्टसोबत अमृत भारत ट्रेनचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. अमृत भारत ट्रेनला २२ डबे आहेत. १२ द्वितीय श्रेणी आणि ८ सामान्य श्रेणीचे डबे आहेत. याशिवाय गार्डचे दोन डबे आहेत. रेल्वेने दिव्यांगांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली आहे. यासाठी एक स्पेशल सोय करून देण्यात आली आहे. पुश-पुल तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला इंजिन जोडण्यात आले आहे. 

दरम्यान, विशेष बाब म्हणजे अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये मेट्रोसारखे गँगवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतात. प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. बॉटल होल्डर देण्यात आला आहे. अशा अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कवच यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरांची नजर, बायो-वॅक्युम टॉयलेट्स, सेंसरवर आधारित नळ, प्रवाशांच्या माहितीसाठी सूचना फलक, एलईडी लाइट्सचा उत्तम वापर, अशा काही गोष्टी अमृत भारत ट्रेनमध्ये दिल्या गेल्या आहेत. याशिवाय सेमी पर्मनंट कपलर्स या ट्रेनमध्ये लावले गेले आहेत. त्यामुळे गाडी सुटताना आणि ब्रेक लावल्यानंतर बसणारे धक्के बहुतांश प्रमाणात कमी होतील, असा दावा करण्यात आला आहे. 
 

Web Title: indian railway minister ashwini vaishnaw said approval for 50 more amrit bharat train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.