'बुलेट ट्रेन' प्रकल्पात असं असणार सूरत येथील स्टेशन, रेल्वे मंत्रालयानं शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:38 PM2022-02-10T18:38:43+5:302022-02-10T18:39:42+5:30
देशात सध्या सर्वसाधारण रुळांवर धावणारी भारतीय रेल्वेला लवकरच बुलेट ट्रेनचा वेग प्राप्त होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) कामानं वेग धरला आहे.
नवी दिल्ली-
देशात सध्या सर्वसाधारण रुळांवर धावणारी भारतीय रेल्वेला लवकरच बुलेट ट्रेनचा वेग प्राप्त होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) कामानं वेग धरला आहे. यातच रेल्वे मंत्रालयाकडून आता गुजरातच्या सूरत येथे प्रस्ताविक असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकाचे काही ग्राफिक फोटो शेअर करण्यात आले आहेत. "डायमंड सिटी म्हणून ओळख असलेल्या सूरतमध्ये काम सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्टेशनचे हे ग्राफिकल चित्रण आहे. डायमंडच्या डिझाइनमध्ये या स्टेशनची बहुमजली इमारत निर्माण केली जाणार आहे. यात सेंट्रलाइज्ड एसी, स्वयंचलित जिना, बिझनेस लाऊंजसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यातून नव्या भारताचं दर्शन जगाला होईल", असं ट्विट रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून ट्विट करण्यात आलेल्या तीन फोटोंमध्ये एक फोटो सध्या सुरू असलेल्या निर्माण कार्याचा देखील आहे. तर उर्वरित दोन फोटो काम पूर्ण झाल्यानंतर सूरत स्टेशन कसं असेल याची ग्राफिकल मांडणी करण्यात आली आहे. सूरत बुलेट ट्रेन स्टेशनची इमारत बाह्यबाजूनं एखाद्या डायमंडसारखी भासेल असं डिझाइन केलं जाणार आहे.
डायमंड सिटी सूरत में बनने वाले बुलेट ट्रेन स्टेशन का ग्राफिकल चित्रण!
— Ministry of Railways (@RailMinIndia) February 10, 2022
डायमंड के डिजाइन में बनने वाला यह बहुमंजिली स्टेशन सेंट्रलाइज्ड एसी, स्वचालित सीढ़ी, बिजनेस लाउंज जैसी विश्वस्तरीय सुविधाओं से लैस होगा, जो नए भारत की नई तस्वीर पेश करेगा। pic.twitter.com/zw77Vp4Gzk
२०२४ पर्यंत पूर्ण होणार सूरत स्टेशनचं काम
रेल्वे मंत्रालयाकडून ट्विट करण्यात आलेले फोटो पाहता बुलेट ट्रेनच्या मार्गातील स्थानकं एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासारखी सुसज्ज असणार आहेत इतकं नक्की. माध्यमांमधील बातम्यांनुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील सूरत स्थानकाचं काम २०२४ सालापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडे देण्यात आली आहे.
५०८ किमी लांबीच्या मार्गावर असणार एकूण १२ स्थानकं
मुंबई-अहमदाबाद या एकूण ५०७ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकं असणार आहेत. यात साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी स्थानकं असणार आहेत. या मार्गावर बुलेट ट्रेन तब्बल ३२० किमी प्रतितास वेगानं चालवण्याचा सरकारचा मानस आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सूरत सोबतच वापी, बिलिमोरा आणि भरूच स्थानकांचंही काम वेगानं सुरू आहे. ही स्थानकं देखील डिसेंबर २०२४ पर्यंत पू्र्ण होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.