Indian Railway: रेल्वे प्रवाशांना ‘युजर चार्जेस’ द्यावे लागणार; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 07:01 AM2021-10-08T07:01:10+5:302021-10-08T08:55:04+5:30
Railway: लवकरच नोटिफिकेशन, सीएसटीएम, कल्याण, ठाणे, स्टेशनचाही समावेश
प्रसाद कानडे
पुणे : रेल्वे स्थानकांवरून प्रवास सुरू करणे अथवा संपविणे आता प्रवाशांना महागात पडणार आहे. कारण रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी युजर चार्जेस लागू केले जाणार आहे. आयआरएसडीसी व आरएलडीए यांनी याबाबत तयार केलेल्या प्रस्तावास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी केंद्रीय कॅबिनेट समोर हा विषय ठेवला होता. मात्र, कॅबिनेटने आमच्या परवानगीची गरज नसल्याचे सांगितले. त्यानुसार आता आयआरएसडीसीने लवकरच नोटिफिकेशन निघणार आहे.
नोटिफिकेशन निघाल्यानंतर तत्काळ पुणेसह देशभरतील प्रमुख स्थानकांवर युजर चार्जेस लागू होतील. हे चार्जेस प्रवाशांच्या तिकिटात समाविष्ट असतील. विमानतळच्या धर्तीवर पुणेसह देशांतील महत्त्वाच्या स्थानकाचा विकास केला जाणार आहे. स्थानकाच्या विकासासाठी आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन) व आरएलडीए (रेल्वे लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) ही संस्था काम करते.
किती असणार चार्जेस?
प्रवाशांना युजर चार्जेसच्या नावाखाली १० ते ४० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. तिकीट श्रेणीनुसार हे चार्जेस असतील. व्हिजिटर फी देखील असणार आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी फलाटावर येणाऱ्या व्यक्तींना केवळ फ्लॅटफॉर्म तिकीट काढणे अनिवार्य होते. आता मात्र त्यांना फलाटवर येण्यासाठी व्हिजिटर फीदेखील द्यावी लागणार आहे. ती फी १० रुपये असण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी युजर चार्जेस आकारले जातील. याचे लवकरच नोटिफिकेशन निघेल. - एस. के. लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआरएसडीसी, नवी दिल्ली
या स्थानकांचा समावेश
आयआरएसडीसी महाराष्ट्रातील पुणे, सीएसटीएम, कल्याण, ठाणे, ठाकुर्ली, एलटीटी आदी स्थानकांचा विकास करणार आहे.