Coronavirus: भारतीय रेल्वेचा खास प्लॅन तयार; ट्रेनच्या कोचमध्ये आता होणार नाही ‘कोरोना’ची एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 02:54 PM2021-06-16T14:54:18+5:302021-06-16T14:56:23+5:30
Indian Railway: गेल्या २ वर्षापासून लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळे रेल्वेचं आर्थिक नुकसान होत आहे.
भोपाळ – सध्या संपूर्ण जगासह भारतातही कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांचा जीव गेला आहे. आजही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या लॉकडाऊन दरम्यान मागील २ वर्षापासून रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे रेल्वेला मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. या गोष्टी लक्षात ठेऊन रेल्वेने आता विशेष कोच तयार केले आहेत. ज्यामुळे रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे.
याबाबत रेल्वेचे ज्येष्ठ अधिकारी विजय यांनी सांगितले की, गेल्या २ वर्षापासून लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळे रेल्वेचं आर्थिक नुकसान होत आहे. प्रवाशांवर घातलेली बंधन आणि त्यांच्या सुरक्षेचा विचार करता रेल्वेकडून विशेष कोच तयार करण्यात आले आहे. हे खास कोच अशारितीने बनवण्यात आले आहेत जेणेकरून प्रवाशांना कोरोनापासून संरक्षण मिळेल. खास कोचमध्ये ज्या मटेरियलचा वापर करण्यात आला आहे त्यावर कोरोना व्हायरसचा विषाणू टीकू शकणार नाही असं ते म्हणाले.
त्याशिवाय या कोचमध्ये सॅनिटायज्ड एअर पाठवण्यात येईल ज्यामुळे वॅक्यूम बनून हवेतच कोरोना विषाणूला मारलं जाईल. सध्या आयएसओ प्रमाणित भोपाळ एक्सप्रेसमध्येच हे विशेष कोच लावण्यात येणार आहेत. ही LHB श्रेणीतील विशेष कोच असतील कारण व्हायरस बंद कम्पार्टंमेंटमध्ये पसरण्याची शक्यता जास्त असते. परंतु कधीपर्यंत भोपाळच्या निशातपुरा कोच फॅक्टरीमधून हे कोच उपलब्ध होतील हे सांगणे कठीण आहे असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या हा प्रकल्प सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
काय आहेत वैशिष्टे?
या खास रेल्वे कोचमध्ये ह्यूमन टच खूप कमी ठेवण्यावर भर दिला आहे.
कोचच्या आतमध्ये विशेष केमिकल लेयर बनवण्यात आली आहे. ज्यावर व्हायरस चिटकू शकत नाही.
कोचमध्ये सर्वात जास्त मानवी अवयवांचा स्पर्श नळ आणि दरवाज्याच्या हँडलवर होतो. त्यामुळे या हॅँडल्स आणि नळांवर केमिकल कोटींग लावण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यावर व्हायरस चिटकू शकत नाही.
तसेच टॉयलेटमध्ये सेंसर बेस्ड हँड सॅनिटायझर आणि डिस्पेंसरची व्यवस्था करण्यात आली आहे.