Union Budget 2022: मोदी सरकारला हे शक्य होईल का? गेल्या ३ वर्षांत फक्त २ वंदे भारत सेवेत; आता ४०० ट्रेनची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 06:42 PM2022-02-02T18:42:19+5:302022-02-02T18:43:26+5:30
Union Budget 2022: आागामी ३ वर्षांत ४०० वंदे भारत ट्रेन हे केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय रेल्वेसमोर मोठे आव्हान असेल.
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेने (Indian Railway) कात टाकल्याचे पाहायला मिळत आहे. सेवा, सुविधा, सुरक्षा यावर भारतीय रेल्वे भर देत असल्याचे दिसत आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2022) रेल्वेच्या वाट्याला फार मोठे काही आलेले दिसत नसले, तरी तब्बल ४०० वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत केवळ २ वंदे भारत सेवेत आल्या असून, आता थेट ४०० ट्रेन सुरू करण्याचे प्रचंड मोठे आव्हान केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय रेल्वेसमोर असणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, पुढील तीन वर्षांत अत्याधुनिक सुविधा असलेल्या न्यू जनरेशनच्या ४०० वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केली. वास्तविक पाहता, सन २०१९ मध्ये वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला या ट्रेनचे नाव ट्रेन-१८ असे ठेवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तिचे नामकरण वंदे भारत असे करण्यात आले. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
वंदे भारत ट्रेनसाठी जलदगतीने काम करण्याची गरज
वंदे भारत ट्रेनच्या सेवा वाढवण्यासाठी जलदगतीने काम करण्याची गरज आहे. आगामी प्रत्येक महिन्याला जवळपास सात ते आठ नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील असेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मात्र, या प्रतिक्रियेनंतर सरकारने ४०० नवीन ट्रेन सुरू करण्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार, हा प्रश्न राहतोच.
दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा स्पीड १८० किमी प्रति तास आहे. मात्र, भारतीय रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कॉरिडॉरसाठी तशा प्रकारचे मार्ग, रुळ यांचे जाळे विणणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे.