Indian Railway: काय सांगता, कचोरी घेण्यासाठी ड्रायव्हरने चक्क रेल्वे थांबवली, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 04:18 PM2022-02-22T16:18:09+5:302022-02-22T16:34:31+5:30
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ही घटना असून एनडीटीव्हीने एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे याबाबतचे वृत्त दिले आहे.
अलवर - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या एका रेल्वे ड्रायव्हरने दही खरेदी करण्यासाठी चक्क ट्रेनच थांबवली होती. लाहोरनजीक एका रेल्वे स्टेशनजवळ ड्रायव्हरने हे कृत्य केलं होतं. लोकांच्या निदर्शनास ही बाब येताच, गोंधळ उडाला होता. पाकिस्तानमधील या कृत्याची पुनरावृत्ती भारतात झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये, येथील रेल्वे चालकाने कचोरी खाण्यासाठ चक्क ट्रेन थांबवल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ही घटना असून एनडीटीव्हीने एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे याबाबतचे वृत्त दिले आहे. अलवर जिल्ह्यानजीकच्या एका स्टेशनजवळची ही घटना असल्याचे उघडकीस आली आहे. या व्हायरल व्हिडिओत दिसून येते की, एक व्यक्ती हातात कचोरीचं पॅकेट घेऊन उभा आहे. थोड्याच वेळात रेल्वे तेथे पोहोचते. त्यावेळी, ती व्यक्ती हातातील कचोरीचं पॅकेट रेल्वे इंजिनच्या ड्रायव्हरकडे देते. त्यानंतर, कचोरी घेताच ट्रेन निघून जाते.
या व्हिडिओतून एक गोष्ट लक्षात येते की, ट्रॅकवर उभारलेल्या व्यक्तीला अगोदरच माहिती होते की ट्रेन येत असून ड्रायव्हर गाडी थांबविणार आहे. विशेष म्हणजे कचोरीच्या नादात फाटकाबाहेर लोकांना काही वेळ वाट पहावी लागली. कचोरी, ड्रायव्हर आणि व्यक्तीची ही घटना अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून अनेकांना पाकिस्तानच्या त्या घटनेची आठवण झाली. ज्यामध्ये, दही घेण्यासाठी ट्रेन चालकाने चक्क रेल्वे थांबवली होती.