Indian Railway: भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार? रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले, म्हणाले याची कुठलीही शक्यता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 01:20 PM2023-03-20T13:20:06+5:302023-03-20T13:25:37+5:30
Indian Railway Privatization: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारभारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. ही शंका जुनी झाली आहे. रेल्वेचं खासगीकरण करण्याची कुठलीही शक्यता नाही आहे, असे सांगतं अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे.
न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीच्या चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या खासगीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही शंका आता जुनी झाली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, असं सांगितलं होतं. रेल्वे एवढी कॉम्प्लेक्स आहे. सोशल ऑब्लिगेशन आहे, सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे. त्यामुळे तिच्या खासगीकरणाचा कुठलाही इरादा नाही आहे. स्पष्टपणे सांगायचं तर रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकपणा आणला आहे. २११ शहरांमधील ७२६ सेंटरमध्ये १५ भाषांमध्ये १.२५ कोटी परीक्षार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षेचं आयोजन करणं सोपं नाही. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा नेतृत्व देशाला कुठल्या दिशेने घेऊन जाऊ इच्छित आहे हे स्पष्ट असतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार देण ही मोठी गोष्ट आहे.
रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, रेल्वे एक टेक्निकल डिपार्टमेंट आहे. टेक्निकल डिसिजन खूप मौल्यवान असतं. मात्र सर्वांची आपलं काम करण्याची एक पद्धत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ तास काम करतात. पहाटे ४ वाजता जपानहून पोहोचून कॅबिनेट मिटिंगमध्ये उपस्थित राहतात. ते मेहनत आणि पराकाष्ठेचं ज्वलंत उदाहरण समोर ठेवतात. आपल्या देशातील वर्क कल्चरमध्ये परिवर्तन आलं आहे. पारदर्शकता वाढली आहे. नेतृत्व स्पष्ट असलं तर सर्व टीमना काम करणं सोपं पडतं. तसेच ती स्पष्टता पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत.
भारत गौरव ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्यापक विचार आहे. तुम्ही जेव्हा कुठल्याही देशात जाता तेव्हा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांचा हेतू प्रभावी पद्धतीने आपली संस्कृती दाखवण्याचा असतो. भारतामध्ये लाखो गोष्टी आहेत. रेल्वेने त्यांचंच माध्यम बनवलं पाहिज, असेही त्यांनी सांगितले.