२०३० पर्यंत भारतीय रेल्वे होणार १०० टक्के उत्सर्जनमुक्त -पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 05:04 AM2020-07-14T05:04:03+5:302020-07-14T05:04:45+5:30
गोयल यांनी तीनदिवसीय ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेत ३0 देशांतील ५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे २०३० पर्यंत जगातील पहिली १०० टक्के हरित रेल्वे बनेल. आपल्या रेल्वेचे शुद्ध उत्सर्जन (नेट एमिशन) शून्यावर आलेले असेल, असे प्रतिपादन वाणिज्य व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.
गोयल यांनी तीनदिवसीय ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेत ३0 देशांतील ५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले. ७५ सत्रांत जगातील २५० वक्त्यांनी परिषदेला संबोधित केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारत पुन्हा एकदा क्रियाशील होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आम्ही नेहमीच जलद गतीने पूर्ववत होण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. यावेळीही हेच दिसून येत आहे. कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या संकटातून
भारतीय अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. तथापि, प्रत्येक आव्हान भारताने यशस्वीरीत्या पेलले आहे. प्रत्येक संकटातून भारत फार जलद गतीने सावरला आहे. प्रत्येकवेळी तो अत्यंत वेगाने सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. याहीवेळी भारताच्या याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वेच्या १०० टक्के विद्युतीकरणास मंजुरी दिली आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठी रेल्वे आहे. विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वे जगातील पहिली १०० टक्के हरित रेल्वे असेल. भारतीय रेल्वेचे शुद्ध-उत्सर्जन शून्य असेल. विशेष म्हणजे १०० टक्के उत्सर्जनमुक्त असलेली भारतीय रेल्वे जगातील सर्वांत मोठी रेल्वेही असेल, असे गोयल यांनी या परिसंवादात सांगितले.
शंभर टक्के विद्युतीकरणाची योजना
- १,२०,०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रेल्वेमार्ग भारतात आहेत. हे सर्व रेल्वेमार्ग १00 टक्के विद्युतीकृत करण्याची सरकारची योजना आहे. पंतप्रधानांनी या प्रकल्पास मान्यता दिली आहे.
- आमच्या नियोजनानुसार, २०३० पर्यंत विद्युतीकरणाचा हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. सर्व मार्गांचे विद्युतीकरण तोपर्यंत पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.