आता चिंता मिटली, वेटिंग लिस्टचं टेन्शन दूर! प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने आणली ‘ही’ योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 07:31 AM2020-09-09T07:31:52+5:302020-09-09T07:34:12+5:30
ज्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेची वेटिंग लिस्ट खूपच मोठी आहे अशा मार्गावर क्लोन ट्रेन(Clone Trains) चालवण्याचं नियोजित आहे.
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने(Indian Railways) प्रवाशांना गाड्यांच्या प्रतीक्षा यादीच्या(Waiting List) घोळातून मुक्त करण्याचं नियोजन केले आहे. आता ट्रेनमध्ये तिकीट काढण्यापूर्वी वेटिंग लिस्टचं टेन्शन घेण्याची गरज भासणार नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांना कन्फर्म सीट देण्याची योजना तयार केली आहे, जेणेकरुन प्रवाशांना वेटिंग तिकिटे असली तरीही ट्रेनमध्ये बसण्यास जागा मिळू शकतील.
क्लोन ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना
मोठ्या वेटिंग लिस्टमुळे अडचणीत आलेल्या प्रवाशांचा तणाव दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने क्लोन ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लोन ट्रेनमधून फक्त तेच प्रवासी प्रवास करू शकतील, ज्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी वेटिंग तिकिटे मिळाली आहेत. क्लोन ट्रेनच्या योजनेमुळे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची प्रवाशांची चिंता दूर होणार आहे.
क्लोन ट्रेन कशी असेल?
क्लोन ट्रेन इतर विशेष गाड्यांप्रमाणे असेल. रेल्वेने त्याचे नाव क्लोन ट्रेन(Clone Train) असं ठेवलं कारण या ट्रेनचा नंबर सारखाच असेल ज्याची प्रवाशांना वेटिंग तिकिटे मिळाली असतील. तथापि, क्लोन ट्रेन ही वेगवान असेल आणि ट्रेन मर्यादित स्थानकांवर थांबेल. क्लोन ट्रेनमध्ये तृतीय क्लास एसी कोचला प्राधान्य दिलं जाईल.
क्लोन ट्रेन कशी धावेल?
ज्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेची वेटिंग लिस्ट खूपच मोठी आहे अशा मार्गावर क्लोन ट्रेन(Clone Trains) चालवण्याचं नियोजित आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विशेष गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट जास्त असेल तर अशा परिस्थितीत आणखी एका ट्रेनची व्यवस्था केली जाईल. क्लोन ट्रेन ही मुख्य ट्रेन सुटल्यानंतर अंदाजे एक तासाने धावेल. मुख्य रेल्वे मार्ग आणि प्लॅटफॉर्मवरून क्लोन ट्रेनदेखील धावतील. यामुळे ज्या प्रवाशांकडे वेटिंग लिस्ट तिकिट असेल त्यांना ही सुविधा उपलब्ध होईल.
कोण प्रवास करू शकेल?
ज्या प्रवाशांची तिकिटे वेटिंग लिस्टच्या मोठ्या यादीत आहे, ते रेल्वेच्या क्लोन ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील. उदाहरणार्थ, बिहारहून दिल्लीकडे जाणारी संपूर्ण क्रांती एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट मोठी असल्यास, ही मुख्य रेल्वे सुटल्यानंतर त्याच नंबरची आणखी एक रेल्वेगाडी एक तास किंवा काही वेळाने दिल्लीकडे धावेल. ज्यामध्ये बिहार संपूर्ण क्रांतीच्या वेटिंग लिस्टमधील तिकिटे असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
१२ सप्टेंबरपासून ८० नवीन गाड्या धावतील
१२ सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे ४० जोडी म्हणजेच ८० नवीन विशेष गाड्या धावणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार १२ सप्टेंबरपासून सुरू होणा ८० नवीन गाड्यांसाठी १० सप्टेंबरपासून आरक्षण सुरू होईल. या गाड्या यापूर्वी चालणार्या २३० गाड्यांव्यतिरिक्त असतील.