कोरोना काळात रेल्वेचे अच्छे दिन, भंगार विकून केली बक्कळ कमाई; वर्षभरात तब्बल 4575 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:05 AM2021-07-05T09:05:50+5:302021-07-05T09:08:51+5:30
Railways’ Bumper Earning by Scraps : रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठे उत्पन्न मिळवले आहे. RTI मधून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेची प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र आता कोरोना काळातही भारतीय रेल्वेला अच्छे दिन आले आहेत. भंगार विकून बक्कळ कमाई केली आहे. वर्षभरात तब्बल 4575 कोटी कमावले आहेत. रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठे उत्पन्न मिळवले आहे. RTI मधून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, 2020-21 या वर्षात भारतीय रेल्वेने भंगार विक्रीतून तब्बल 4575 कोटी रुपये कमावले आहेत. ही भंगार विक्रीतून झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे. यापूर्वी 2010-11 साली रेल्वेने भंगार विकून 4,409 कोटी रुपये मिळवले होते. रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुने इंजिन, डब्बे अशा गोष्टींचा समावेश आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्याप्रमाणावर भंगार निघते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलावप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. रेल्वे खात्याने 2021-22 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 4100 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. "2020-21 या आर्थिक वर्षात रेल्वे बोर्डाच्या 4000 कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत रेल्वेने भंगारातून 4575 कोटी रुपये जमा केले. भंगार विक्रीतून भारतीय रेल्वेने आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली होती. हे लक्ष्य निर्धारित लक्ष्यापेक्षा सुमारे 14 टक्के अधिक आहे आणि गेल्या आर्थिक वर्षातील भंगार विक्रीच्या आकड्यांपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे" अशी माहिती रेल्वे प्रवक्त्यांनी दिली आहे.
आरटीआय कायद्यांतर्गत मध्य प्रदेशमधील चंद्रशेखर गौर यांनी मागितलेल्या माहितीला उत्तर देताना रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या साथीने 2020-21 मध्ये त्रस्त झालेल्या रेल्वेने गेल्या वर्षाच्या तुलनेत भंगारातून यावेळी पाच टक्के अधिक उत्पन्न मिळवले आहे. 2019-20 मध्ये 4333 कोटी रुपयांच्या भंगार वस्तूंची विक्री झाली आणि 2020-21 मध्ये भंगारातून तब्बल 4575 कोटी रुपये मिळाले असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. तसेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी भंगार विक्रीतून रेल्वे बोर्डाने 4,100 कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.