रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलत न देता कमावले १५०० कोटी रुपये; पुन्हा सवलती देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 06:05 AM2022-05-18T06:05:22+5:302022-05-18T06:05:51+5:30

रेल्वेने कोरोना कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

indian railways earned rs 1500 crore without giving concessions to senior citizens demand for concessions again | रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलत न देता कमावले १५०० कोटी रुपये; पुन्हा सवलती देण्याची मागणी

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलत न देता कमावले १५०० कोटी रुपये; पुन्हा सवलती देण्याची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रेल्वेने कोरोना महामारीच्या कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे रेल्वेने १५०० रुपये कमावले. आरटीआयमधून ही माहिती उपलब्ध झाली आहे; परंतु आता या सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी होत
आहे.

मध्य प्रदेशचे चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या माहितीचा अधिकार (आरटीआय) अर्जाच्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. रेल्वेने सांगितले आहे की, २० मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान रेल्वेकडून ७.३१ कोटी ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्यात आल्या नाहीत. यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ४.४६ कोटी पुरुष, ५८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व ८,३१० ट्रान्सजेंडरचा समावेश आहे.

आरटीआयमध्ये मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे की, या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांकडून एकूण ३,४६४ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यात सवलत बंद झाल्यामुळे मिळालेल्या १,५०० कोटी रुपयांचा समावेश आहे. 

ट्रान्सजेंडर प्रवाशांकडून ४५.५८ लाखांची कमाई

पुरुष प्रवाशांकडून २०८२ कोटी रुपये, महिला प्रवाशांकडून १३८१ कोटी व ट्रान्सजेंडरकडून ४५.५८ लाख रुपयांचा महसूल कमावला. महिला ज्येष्ठ नागरिक प्रवासी ५० टक्के, तर पुरुष व ट्रान्सजेंडरना ४० टक्के सूट दिली जाते.

सवलती सोडण्यासाठी केले होते प्रोत्साहित

- रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींमुळे रेल्वेला दरवर्षी सुमारे २००० कोटी रुपयांचा बोजा पडतो. ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत एकूण सवलतीच्या सुमारे ८० टक्के आहे. 

- यापूर्वी रेल्वेने ज्येष्ठांना सवलती सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु रेल्वेचा हा प्रयत्न अयशस्वी राहिला. ‘कॅग’च्या २०१९च्या अहवालानुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या योजनेला फार उत्साहजनक प्रतिसाद मिळाला नाही.

पुन्हा सवलती देण्याची मागणी

मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटांवर मिळणारी सवलत बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय अद्याप कायम आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतांनुसार ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलती कायम ठेवल्या जाऊ शकत नाहीत. कोरोनामुळे २०२० ते २१ पर्यंत रेल्वेसेवा बंद होत्या; परंतु आता लोकांचे जनजीवन पुन्हा पूर्ववत होत असताना रेल्वेसेवा रुळांवर येत आहे. अशा स्थितीत सवलती बहाल करण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: indian railways earned rs 1500 crore without giving concessions to senior citizens demand for concessions again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.