भारतीय रेल्वेची प्रथमच देशाबाहेर पार्सल सेवा; बांगलादेशात पाठविली आंध्र प्रदेशातील वाळलेली मिर्ची
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 05:11 AM2020-07-14T05:11:25+5:302020-07-14T07:22:17+5:30
आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मिर्ची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध आहे.
गुंटूर : भारतीय रेल्वेने इतिहासात प्रथमच देशाच्या सीमा ओलांडून मालवाहतूक सेवा दिली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रेड्डीपालेम येथील वाळलेली मिर्ची रेल्वेच्या ‘स्पेशल पार्सल ट्रेन’ने बांगलादेशातील बेनापोले येथे पोहोचविली आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक टष्ट्वीट करून याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, ‘देशाच्या सीमांच्या पलीकडे : निर्यातीसाठी तयार होताना रेल्वेने पहिल्यांदाच वाळलेली मिर्ची ‘स्पेशल पार्सल ट्रेन’ने बांगलादेशात पाठविली आहे.’
आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मिर्ची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध आहे. येथून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात मिर्ची निर्यात होते. येथील शेतकरी आणि व्यापारी निर्यातीसाठी रस्ते वाहतुकीचा वापर आजपर्यंत करीत होते. त्यांचा वाहतुकीचा प्रतिटन खर्च ७ हजार रुपये होता. तथापि, लॉकडाऊनच्या काळात रस्ते वाहतूक बंद झाल्यामुळे मिर्चीची निर्यातही थांबली. ही बाब जेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांना समजली तेव्हा ते स्वत:च शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे गेले. रेल्वेच्या मालवाहतूक सेवेची माहिती त्यांना दिली. तथापि, रेल्वेच्या मालवाहतूक सेवेत एक मोठी अडचण होती. एका खेपेत किमान १,५00 टन माल असेल, तरच मालवाहू रेल्वे बुक करता येते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना ते गैरसोयीचे होते.
यावर मार्ग काढण्यासाठी रेल्वेने छोट्या म्हणजे ५00 टनांपर्यंतच्या खेपा स्वीकारण्यााचे मान्य केले. दक्षिण-मध्य रेल्वेच्या गुंटूर विभागाने त्यासाठी पुढाकार घेऊन बांगलादेशला मिर्ची पाठविण्यासाठी ‘स्पेशल पार्सल एक्स्प्रेस’ची व्यवस्था केली. त्याचा मोठा फायदा शेतकरी व व्यापाºयांना झाला. आपली मिर्ची थेट बांगलादेशात पाठविणे त्यांना शक्य झाले.
कोविड-१९ विषाणू साथीमुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. यातून होऊ शकणारी संभाव्य समस्या टाळण्यासाठी रेल्वेने देशातील मालवाहतुकीची धुरा सांभाळली आहे. औषधी, वैद्यकीय उपकरणे, अन्नधान्य इत्यादी आवश्यक वस्तूंची वाहतूक रेल्वेकडून केली जात आहे. छोट्या पार्सल आकारातही रेल्वे वाहतूक करीत असल्यामुळे देशातील व्यावसायिक व सामान्य नागरिकांची मोठी सोय झाली आहे. ई-कॉमर्स संस्था आणि राज्य सरकारे यांच्यासाठीही रेल्वेने पार्सल सेवा तातडीने उपलब्ध करून दिली
आहे.
रेल्वे सूत्रांनी सांगितले की, २२ मार्च ते ११ जुलै २0२0 या काळात ४,४३४ पार्सल ट्रेन चालविण्यात आल्या. त्यातील ४,३0४ गाड्या कालबद्ध वेळापत्रकावर आधारित होत्या.
१६ पार्सल व्हॅनची स्पेशल ट्रेन
- १६ पार्सल व्हॅन असलेली एक स्पेशल पार्सल ट्रेन बांगलादेशातील बेनापोलेला पाठविण्यात आली आहे. यातील प्रत्येक पार्सल व्हॅनमध्ये वाळलेल्या मिर्च्यांची ४६६ पोती आहेत. एका व्हॅनमधील मिर्च्यांचे वजन १९.९ टन आहे. एका स्पेशल पार्सल ट्रेनमधून एकूण ३८४ टन वाळलेली मिर्ची बांगलादेशला पाठविण्यात आली.
- यात प्रतिटन वाहतुकीचा खर्च ४,६0८ रुपये आला. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. रस्ते वाहतुकीद्वारे प्रतिटन खर्च सुमारे ७ हजार रुपये होता.