रेल्वे अडीच तास लेट, बहिणीचा पेपर चुकेल; भावाच्या ट्विटनंतर ट्रेन सुस्साट सुटली अन्...
By कुणाल गवाणकर | Published: February 4, 2021 03:40 PM2021-02-04T15:40:36+5:302021-02-04T15:54:35+5:30
विद्यार्थिनीचा पेपर चुकू नये म्हणून रेल्वेनं वेग वाढवला; एका ट्विटच्या आधारे विद्यार्थिनीला मदत
वाराणसी: लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या अनेकदा उशिरा पोहोचतात. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार एका विद्यार्थिनीसोबत घडला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होऊन वर्ष वाया जातं की काय, अशी भीती तिला वाटू लागली. मात्र एका ट्विटमुळे सगळंच बदललं. ट्रेन इतकी वेगानं पळू लागली की विद्यार्थिनी १ तास आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचली. विद्यार्थिनीचं वर्ष फुकट जाऊ नये, तिचा पेपर चुकू नये यासाठी रेल्वेनं दाखवलेल्या या कार्यक्षमतेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
गाझीपूरच्या नाजिया तबस्सुमला डीएलएडचा पेपर देण्यासाठी वाराणसीतल्या वल्लभ विद्यापीठ बालिका इंटर कॉलेजमध्ये जायचं होतं. बुधवारी दुपारी१२ वाजता तिचा पेपर होता. तिनं छपरा-वाराणसी सिटी एक्स्प्रेससाठी मऊमधून तिकीट आरक्षित केलं होतं. एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी मऊला यायला हवी होती. मात्र ती तब्बल २ तास ५३ मिनिटं उशिरा मऊला आली. ट्रेन ९ वाजून १८ मिनिटांनी मऊला पोहोचली.
दारू न पिताच या महिलेला चढते नशा, लिवरही झालं खराब; कारण वाचून व्हाल अवाक्...
नाजियाचा पेपर चुकणार अशी भीती वाटू लागल्यानं तिचा भाऊ अन्वर जमाल यांनी रेल्वेला टॅग करत एक ट्विट केलं. 'ट्रेन २ तास २७ मिनिटं उशिरानं धावते आहे. वाराणसीत दुपारी १२ वाजता माझ्या बहिणीला पेपर द्यायचा आहे. कृपया मदत करा,' असं जमालनं ट्विटमध्ये म्हटलं. या ट्विसोबत त्यानं नाजियाच्या पेपरचं वेळापत्रक, ट्रेनचा क्रमांक आणि पीएनआर क्रमांक शेअर केला. अन्वरच्या ट्विटला रेल्वेनं लगेच उत्तर दिलं. त्यांनी त्याचा मोबाईल नंबर मागितला आणि तातडीनं व्यवस्था करू असं आश्वासन दिलं.
'या' तरूणाला मिळालं नवं जीवन, डॉक्टरांनी लावला दुसऱ्याचा चेहरा आणि दोन्ही हात...
अन्वरच्या एका ट्विटनंतर रेल्वे प्रशासनानं वेगानं चक्रं फिरवली. थेट कंट्रोल रुमला मेसेज केला गेला. ट्रेनचा वेग वाढवण्यात आला. त्यामुळे तीन तास उशिरा पोहोचू शकणारी ट्रेन दोन तास उशिरा (११ वाजता) वाराणसीला पोहोचली. बहिण परीक्षा केंद्रावर पोहोचताच अन्वरनं ट्विट करून रेल्वेचे आभार मानले. बलिया-फेकना दरम्यान स्पीड ट्रायल सुरू असल्यानं ब्लॉक सुरू होता. मात्र विद्यार्थिनीचा पेपर चुकण्याची शक्यता असल्यानं तातडीनं मदत करण्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.