धावत्या ट्रेनमध्ये मिळणार 'मसाज' सर्व्हिस; रेल्वेची नवीन सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 05:37 PM2019-06-08T17:37:28+5:302019-06-08T17:45:24+5:30
देशातील विविध भागात इंदोरहून सुटणाऱ्या 39 ट्रेनमध्ये मसाज सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
नवी दिल्ली : लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आराम मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासन सतत अनेक सुविधा उपलब्ध करुन देत आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना चांगल्या रेस्टॉरंटमधील जेवण असो किंवा वंदे भारत यासारख्या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या विमानासारख्या सुविधा. यातच आता रेल्वे प्रवाशांसाठी खास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आता धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना मसाज करुन घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा खासकरुन इंदूरहून सुटणाऱ्या 39 ट्रेनमध्ये असणार आहे.
रेल्वे प्रवाशांना मसाजची सुविधा (Massage Service) उपलब्ध करुन दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाला दरवर्षी जवळपास 20 लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो. तसेच, जवळपास 90 लाख रुपयांची अतिरिक्त तिकीट विक्री सुद्धा होऊ शकते, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.एन. सुनकर यांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रतलाम रेल्वे विभागाने न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) मार्फत लायसन्स ऑफ अग्रिमेंट (एलओए) जारी करण्यात आले आहे.
100 रुपयांत मिळणार मसाज सुविधा
देशातील विविध भागात इंदोरहून सुटणाऱ्या 39 ट्रेनमध्ये मसाज सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. यासाठी प्रत्येक गाडीत दोन अनुभवी व्यक्ती असणार आहे. तसेच, या सेवेसाठी 100 रुपये प्रवाशाला मोजावे लागणार आहेत. तसेच, या व्यक्तींचे फोन नंबर टीटीई आणि कोचमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यावेळी गरज असेल, त्यावेळी प्रवासी फोन करुन मसाज करणाऱ्या व्यक्तीला बोलवू शकतो. प्रवासी या सेवेचा फायदा सकाळी सहा ते रात्री दहावाजेपर्यंत घेऊ शकणार आहेत.
ही सुविधा यशस्वी झाली तर....
रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने पहिल्यांचा अशी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देत आहे. इंदूरमधील सुटणाऱ्या गाड्यांमध्ये ही सुविधा यशस्वी झाली तर रतलाम, उज्जैनहून सुटणाऱ्या गाड्यांमध्येही प्रवाशांसाठी मसाजची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.