Indian Railways: एजंटांकडून रेल्वे तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनो व्हा सावध! अन्यथा तुम्हाला मिळणार नाही सीट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:28 PM2022-01-17T17:28:33+5:302022-01-17T17:31:18+5:30
Illegal Booking Train Ticket News: एजंट तिकीट बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून जास्त पैसे घेतात तर कधी चुकीची तिकिटे देतात. यावेळी रेल्वेने याबाबत कारवाईचा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही एजंटकडून तिकीट बुक करत असाल तर सावध व्हा, अन्यथा तुमचे पैसेही जातील आणि तिकीट मिळणार नाही. आधीपासूनच रेल्वेकडून बेकायदेशीरपणे तिकीट बुक करू नका, असा इशारा सातत्याने दिला जात आहे. एजंट तिकीट बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून जास्त पैसे घेतात तर कधी चुकीची तिकिटे देतात. यावेळी रेल्वेने याबाबत कारवाईचा इशारा दिला आहे.
बेकायदेशीरपणे तिकीट बुक करणाऱ्या आणि प्रवाशांकडून जास्त पैसे घेणाऱ्या एजंटांवर पश्चिम रेल्वेने नुकतीच कडक कारवाई केली आहे. आता अशी तिकिटे बुक करणाऱ्या एजंटांवर रेल्वे कठोर कारवाई करत आहे. पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाकडून दररोज सहा विभागात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 'सामान्य लोकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. आयआरसीटीसीद्वारे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडून तिकीट बुक केले जाते, त्यावेळी सतर्क राहण्याची गरज आहे.'
दरम्यान, पश्चिम रेल्वेने या मोहिमेद्वारे जवळपास 2.15 कोटी रुपयांची ई-तिकीटे आणि प्रवास-सह-आरक्षण तिकिटे जप्त केली आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "पश्चिम रेल्वेच्या RPF ने एजंटांच्या विरोधात विशेष कारवाई करण्यासाठी RPF गुन्हे शाखा, सायबर सेल आणि विभागातील डिटेक्टिव्ह डिटेक्टिव्ह विंगमधील समर्पित कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार केली आहे. त्यानंतर, असे आढळून आले की, हे एजंट अनेक बनावट आयडी वापरून तिकिटे बुक करत होते, ज्यात काही अधिकृत IRCTC एजंट सुद्धा होते. ज्यांनी तिकीट जारी करण्यासाठी बनावट आयडी आणि बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर केला होता.
अशी होते एजंटांवर कारवाई
रेल्वे कायद्याच्या कलम 143 च्या कायदेशीर तरतुदींनुसार या बेकायदेशीर एजंटांवर कारवाई करण्यात येत असल्याचे रेल्वेने सांगितले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाकडून केली जाते. दरम्यान, या गुन्हेगारांवर आयपीसीचे कोणतेही कलम नाही आणि यामुळेच त्यांना भीती वाटत नाही. प्रत्यक्षात एजंटांना रेल्वे न्यायालयात हजर केले जाते, तेथून ते दंड भरून सहज सुटतात.