भारतीय रेल्वेचे वेळापत्रक आता गुगल मॅपवर मिळणार
By Admin | Published: May 12, 2015 11:38 PM2015-05-12T23:38:24+5:302015-05-12T23:38:24+5:30
भारतीय रेल्वेचे वेळापत्रक आता गुगल मॅप्सच्या ‘गुगल ट्राँझिट’ नामक अॅपवर उपलब्ध होणार आहे. कंपनीने आज याची येथे घोषणा केली
मुंबई : भारतीय रेल्वेचे वेळापत्रक आता गुगल मॅप्सच्या ‘गुगल ट्राँझिट’ नामक अॅपवर उपलब्ध होणार आहे. कंपनीने आज याची येथे घोषणा केली. कमी गतीच्या इंटरनेटमुळे भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावरून माहिती मिळविण्यासाठी अनेकदा मनस्ताप सहन करणाऱ्या प्रवाशांना या अॅपमुळे दिलासा मिळेल, अशी आशा आहे.
गुगलच्या निवेदनानुसार, याशिवाय आठ भारतीय शहरांतील सार्वजनिक वाहतुकीची ताजी माहितीही या अॅपवर उपलब्ध होईल. गुगल मॅप्सचे अॅप गुगल ट्राँझिट याच्या मदतीने सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करणे सुकर होणार आहे. हे अॅप कोणत्याही अँड्रॉईड वा आयओएस उपकरण वा डेस्कटॉपच्या माध्यमातून उपलब्ध आहे. सुमारे १२,००० रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक या अॅपवरून उपलब्ध होणार आहे. एवढेच नाहीतर मुंबई, पुण्यासह नवी दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांतील बस आणि मेट्रो मार्गांची माहितीही या अॅपवरून प्रवाशांना मिळेल.
गुगल मॅप्सचे संचालक (कार्यक्रम व्यवस्थापक) सुरेन रहेला यांनी सांगितले की, गुगल ट्राँझिट हे गुगल मॅप्सचे आणखी व्यापक स्वरूप आहे. हे अॅप कोट्यवधी लोकांसाठी योग्य व उपयोगी माहिती उपलब्ध करून देईल. बस, रेल्वे वा मेट्रो अथवा ट्रॉम यासारख्या सार्वजनिक परिवहन सेवांद्वारे प्रवास करणाऱ्यांना याचा लाभ होईल. रेल्वेचे भारतीय वेळापत्रक व देशाच्या आठ शहरांतील सार्वजनिक वाहतुकीची माहिती ट्राँझिटवर उपलब्ध होईल.(प्रतिनिधी)