वंदे भारत ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड; ट्रेनचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवासी घाबरले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:15 IST2024-04-29T18:15:15+5:302024-04-29T18:15:38+5:30
अहमदाबादवरुन मुंबईला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे दार लॉक झाल्याची घटना घडली.

वंदे भारत ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड; ट्रेनचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवासी घाबरले...
Indian Railways: भारतीय रेल्वेतील अत्याधुनिक ट्रेन मानल्या जाणाऱ्या 'वंदे भारत'मध्ये नुकतीच एक त्रुटी दिसून आली आहे. गुजरातच्या अहमदाबादवरुन निघालेली वंदे भारत ट्रेन सुरत रेल्वे स्टेशनवर थांबली. ट्रेन थांबताच तिचे दार उघणे अपेक्षित होते, पण बराच वेळ ट्रेनचे दार उघडलेच नाही. यानंतर एका टीमने ही तांत्रिक समस्या दूर केली आणि ट्रेनमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन अहमदाबादहून मुंबईला जात होती. अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी सुरत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. यावेळी रेल्वेचे दार उघडत नसल्याची तक्रार नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली. यानंतर तात्काळ तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्रुटी दूर करण्याचे काम सुरू केले. सकाळी 8.20 च्या सुमारास ट्रेन सुरतला पोहोचली आणि सुमारे एक तास तिथेच थांबली. काही वेळानंतर त्रुटी दूर करण्यात आली.
वंते भारत ट्रेनचे फीचर्स
सध्या भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन ही वंदे भारत आहे. लक्झरी क्लास पसंत करणाऱ्या लोकांची ही पहिली पसंती आहे. ट्रेनचा वेग आणि हायटेक सुविधांमुळे ही ट्रेन आणखी खास बनली आहे. सध्या ठराविक मार्गांवर चालणारी ही ट्रेन येत्या काळात देशभरात वाढवण्यात येणार आहे.