भारतीय रेल्वे प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देणार, वेळ मर्यादाही निश्चित, जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 08:30 PM2023-11-16T20:30:52+5:302023-11-16T20:34:19+5:30
भारतीय रेल्वेत कन्फर्म तिकीट वेळेत मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो.
आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण, सध्या अनेकांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. यावर आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय रेल्वे सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्याची तयारी करत आहे.आता तिकीटासाठी तुम्हाला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. रेल्वेने कालमर्यादा निश्चित केली आहे. या कालमर्यादेनंतर, ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या संबंधित सीटवर बसून किंवा झोपून प्रवास करु शकतात.
टीका करणारी शेहला रशीद अचानकच कशी बनली मोदींची फॅन? स्वत: तिनंच सांगितलं, हा आहे टर्निंग पॉइंट
सध्या वर्षाला ८०० कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यासाठी मेल, पॅसेंजर, उपनगरीय आणि प्रवासी अशा १०७४८ गाड्या चालवल्या जात आहेत. या ८०० कोटी प्रवाशांपैकी प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळत नाही. यातील अनेकांना वेटिंग तिकिटांवर प्रवास करावा लागतो, जे खूपच गैरसोयीचे आहे. २०२७ पर्यंत प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देण्याची रेल्वेची योजना आहे. त्या दिशेने कामही सुरू झाले आहे.
दरवर्षी १००० कोटी प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेची योजना आहे. यासाठी ३००० अतिरिक्त गाड्या चालवल्या जातील, जेणेकरून प्रत्येकाला कन्फर्म तिकीट देता येईल. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्या वाढवण्याच्या दिशेने सतत काम करत आहे. प्रत्येकाला सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे हे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
सात महिन्यांत ३९० कोटींचा प्रवास
एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एकूण ३९०.२० कोटी प्रवाशांनी सर्व ट्रेनमधून प्रवास केला. यातील बहुसंख्य नॉन-एसी म्हणजेच स्लीपर आणि सामान्य वर्गातील प्रवासी होते. ३७२ कोटी प्रवाशांनी नॉन एसी मध्ये प्रवास केला. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी हे प्रमाण ९५.३ टक्के आहे. एकूण प्रवाशांपैकी १८.२ कोटी प्रवाशांनी एसी क्लासमधून प्रवास केला. रेल्वेच्या सर्व वर्गांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या तुलनेत हे प्रमाण फक्त ४.७ टक्के आहे.