‘डिपार्चर कार्ड’पासून भारतीय प्रवाशांची सुटका
By admin | Published: June 20, 2017 01:09 AM2017-06-20T01:09:04+5:302017-06-20T01:09:04+5:30
विदेशी जाणाऱ्या भारतीय हवाई प्रवाशांना १ जुलैपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रयाणपत्र (डिपार्चर कार्ड्स) भरावे लागणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विदेशी जाणाऱ्या भारतीय हवाई प्रवाशांना १ जुलैपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रयाणपत्र (डिपार्चर कार्ड्स) भरावे लागणार नाही. भारतीयांना विनाकटकट विदेशवारी करता यावी, हा याचा उद्देश आहे.
सध्या विदेशी जाणाऱ्या भारतीयांना नाव, जन्मतारीख, पारपत्र (पासपोर्ट) क्रमांक, पत्ता, विमानाची माहिती तसेच हवाई प्रवासाची तारीख आणि विदेश प्रवासाचे कारण यासंबंधीची माहिती डिपार्चर कार्डमध्ये नमूद करून सादर करावे लागते. प्रवाशांची ही सर्व माहिती अन्य मार्गाने उपलब्ध असते. त्यामुळे ही पद्धत संपुष्टात आणली जात आहे.
रेल्वे, जलमार्ग किंवा रस्त्याने विदेशी जाणाऱ्या भारतीयांना इमिग्रेशन केंद्रावर संबंधित माहिती भरून ते सादर करावे लागेल.
विदेशातून परतणाऱ्यांना अशी माहिती सादर करण्याची पद्धत बंद झाली आहे. पेपरलेस प्रवासाला चालना देणे, हाही याचा उद्देश आहे शुल्क वा करप्राप्त वस्तू विदेशातून न आणणाऱ्या भारतीयांना आल्यानंतर अशी माहिती जाहीर करण्याची पद्धत सीमा शुल्क विभागाने मागच्या वर्षीच बंद केली आहे.
तथापि, विदेशातून सोबत प्रतिबंधित किंवा शुल्क, करप्राप्त वस्तू विदेशातून सोबत आणणाऱ्या प्रवाशांना मात्र ‘इंडियन कस्टम डिक्लेरेशन फॉर्म’ भरणे जरुरी आहे. यापूर्वी भारतात येणाऱ्या प्रत्येकाला हा फॉर्म बंधनकारक होता. प्रवाशांना हॅण्ड बॅगवर सुरक्षेसंबंधी शिक्का उमटविण्याची पद्धतही काही निवडक विमानतळांवर बंद झाली आहे.