'गुरुत्वाकर्षण लहरींना नरेंद्र मोदींचं नाव द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 04:24 PM2019-01-06T16:24:56+5:302019-01-06T16:26:28+5:30
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये शास्त्रज्ञांचे एकापेक्षा एक अजब दावे
जालंधर: लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत आयोजित करण्यात आलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक अजब दावे आणि विधानं केली जात आहेत. रावणाकडे 24 प्रकारची विमानं होती आणि त्याच्या काळात श्रीलंकेत विमानतळं होती, असा दावा आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलपती जी. नागेश्वर राव यांनी केला होता. यानंतर आता तमिळनाडूचे शास्त्रज्ञ कनक जगाथला कृष्णन यांनी आणखी एक अजब दावा केला. गुरुत्वाकर्षण लहरींना नरेंद्र मोदींचं नाव देण्यात यावं, असं विधान त्यांनी केलं.
के. जे. कृष्णन यांनी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक अजब विधानं केली. न्यूटन आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे सिद्धांत पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला. गुरुत्वाकर्षण लहरींना नरेंद्र मोदींचं नाव देण्यात यावं, असंदेखील ते पुढे म्हणाले. आईन्स्टाईन यांच्या सिद्धांतांवर बोलण्यासाठी कृष्णन यांना कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी सुरुवातीलाच आईन्स्टाईन आणि न्यूटन यांचे सिद्धांत चुकीचे असल्याचं म्हटलं. 'न्यूटनला गुरुत्वाकर्षणाच्या नियमांची आणि आईन्स्टाईनला सापेक्षतावादाच्या सिद्धांताची पुरेशी माहिती नव्हती. या दोघांची गुरुत्वाकर्षणाबद्दलची समज अतिशय तोकडी होती. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत,' असा दावा कृष्णन यांनी केला.
आईन्स्टाईननं सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरुन जगाची दिशाभूल केली, असंदेखील के. जे. कृष्णन म्हणाले. ज्या प्रश्नांची उत्तरं आईन्स्टाईन आणि न्यूटनला देता आली नाहीत, त्यांची उत्तरं माझ्याकडे आहेत, असाही दावा त्यांनी केला. येत्या काळात गुरुत्वाकर्षण लहरी 'नरेंद्र मोदी लहरी' आणि गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव 'हर्षवर्धन प्रभाव' म्हणून ओळखला जाईल, असं कृष्णन म्हणाले. कृष्णन हे तमिळनाडूतील अलिवरमधील कम्युनिटी सर्व्हिस सेंटरमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.