भारतीय कौशल्य व प्रतिभेचे जगाला घडले दर्शन, ‘INSविक्रांत’चे जलावतरण करताना पंतप्रधान मोदींचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 06:52 AM2022-09-03T06:52:40+5:302022-09-03T06:53:08+5:30
INS Vikrant: स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरण झाले.
कोची : स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरण झाले. अशा प्रकारच्या मोठ्या विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विक्रांत याचा अर्थ विजयी. आयएनएस विक्रांत केवळ एक भव्य युद्धनौका नाही तर ती भारतीय कौशल्य व प्रतिभेची साक्ष आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे झालेल्या या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार व अन्य मान्यवर उपस्थित होते. मोदी यांनी सांगितले की, संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारने जे प्रयत्न सुरू केले, त्यातील आयएनएस विक्रांत हा महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रयत्नांतूनच २१व्या शतकातील आत्मनिर्भर व समर्थ भारत घडणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
आयएनएस विक्रांत हा एकप्रकारे समुद्रात विहरणारा हवाईतळ किंवा तरंगते शहरच आहे. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतकाळामध्ये आयएनएस विक्रांतचे जलावतरण होत आहे, ही खूप मोठी घटना आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आयएनएस विक्रांत हे आत्मनिर्भर व महत्त्वाकांक्षी भारताचे प्रतीक आहे. आयएनएस विक्रांतसारख्या विमानवाहू युद्धनौकांची स्वदेशात होत असलेली बांधणी हा संरक्षणसिद्धतेतील प्रगतीचा मोठा टप्पा आहे.
- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
काँग्रेसची टीका
युद्धनाैका बांधण्यासाठी आधीच्या सरकारांनी जे प्रयत्न केले होते, त्याचा उल्लेख करणे पंतप्रधान मोदी टाळले, अशी टीका काँग्रेसने केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, जहाजाच्या बांधणीचा प्रारंभ तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. ॲन्टोनी यांच्या हस्ते झाला होता. तर, कोचीन शिपयार्ड, नेव्हल डिझाईन ब्युरो व भारतीय नौदलाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कौतुक केले.