भारतीय सैनिक करण जोहर, महेश भट्टसारखे वागले तर चालेल का - मेजर गौरव आर्य
By admin | Published: October 4, 2016 03:29 PM2016-10-04T15:29:35+5:302016-10-04T15:29:35+5:30
सैनिक महेश भट्ट व करण जोहरप्रमाणे नियंत्रण रेषेपलीकडे गेले आणि पाकिस्तानी सैनिकांना शेक हँड करत बसले तर चालेल का? बाकी सगळे मजा करत असताना, मीच कशाला जीवाशी खेळू असा विचार सैनिकांनी केला तर चालेल का?
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - करण जोहर, महेश भट्ट आदींनी पाकिस्तानी कलाकारांसदर्भात घेतलेल्या भूमिकेचा मेजर गौरव आर्य यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून भारतीय सैनिकांची परिस्थिती मांडली असून करण जोहर व महेश भट्टसारखे मोजके भारतीय सैनिकांचे मनोबल कसे खच्ची करतात याचा दाखला दिला आहे. आर्य यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून ती हजारो जणांनी शेअर केली आहे.
आर्य यांनी मांडलेल्या भूमिकेतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.
- करण जोहर, महेश भट्ट म्हणतात दहशतवाद थांबवा, चर्चा नाही. क्रिकेट बोर्ड पाकिस्तानबरोबर सामने खेळवणार नी काही उद्योग पाकिस्तानबरोबर व्यापार करणार. आणि हे सगळं होत असताना आपले सैनिक मात्र, सीमेवर शहीद होत राहणार.
- पाकिस्तानी कलाकारांना परत पाठवून, क्रिकेट बंद करून आणि व्यापार थांबवून दहशतवाद थांबेल का? नक्कीच थांबणार नाही, परंतु एकीचे भावनात्मक दर्शन तर घडेल. अन्यथा, सैनिक विचारात पडतील, की भारत पाक संबंधांमध्ये फक्त आम्हीच का भरडले जावं?
- भारत - पाकिस्तान वाद हा काही सैनिकांचा वैयक्तिक वाद नाहीये. हे सैनिक मरतात आणि शत्रूला मारतात, तुमच्या नी माझ्यासाठी. विचार करा, जर सैनिकांनी करण जोहर नी महेश भट्टसारखं वागायचं ठरवलं तर चालेल का? सैनिक महेश भट्ट व करण जोहरप्रमाणे नियंत्रण रेषेपलीकडे गेले आणि पाकिस्तानी सैनिकांना शेक हँड करत बसले तर चालेल का? बाकी सगळे मजा करत असताना, मीच कशाला जीवाशी खेळू असा विचार सैनिकांनी केला तर चालेल का?
- कल्पना करा, सैनिक आपल्या वरीष्ठांकडे जातील नी सांगतील, सर मी सीमेवर प्राण द्यायला जातोय, परंतु हे लोक तर सांगताहेत की दोन्ही देशांमध्ये सगळं काही सुरळित आहे म्हणून...
- देशभक्ती आणि त्याग हा काही फक्त सैनिकांनी घेतलेला मक्ता नाहीये. भारत हा जेवढा सैनिकांचा देश आहे, तेवढाच महेश भट्ट यांचाही आहे.
- अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिकवर 1980मध्ये बहिष्कार टाकला तर रशियाने 1984 मध्ये लॉस एंजलिसमधल्या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. ज्यावेळी देशहित सर्वोच्च असतं त्यावेळी असं होतं आणि भारताच्या बाबतीतही असंच व्हायला हवं.
- पाकिस्तान 70 वर्षे भारतीयांचा बळी घेत आहे आणि हे आपल्या एवढं अंगवळणी पडलंय की आपल्याला सिनेमा बनवणं, वा क्रिक्रेट खेळत बसणं हे सैनिकांच्या बलीदानापेक्षा महत्त्वाचं वाटायला लागलंय.
- उरीमध्ये 18 कुटुंबं उध्वस्त झाली, परंतु बॉलीवूडमधून काही ऐकायला मिळायलं नाही, मात्र, फवाद खानला जायला लागलं याचं किती दु:ख झालं. लगेच पाकिस्तानी कलाकारांसाठी ट्विट अत्यावश्यक बनलं.
- हिंदी सिनेजगतात राहत फेतह अली खानच्या पूर्वी संगीतच नव्हतं असं हे निर्माते व दिग्दर्शक तुमच्या गळी उतरवतील. भारतीय क्रिकेट बोर्ड तर पैसे कमवायलाच बसलेलं आहे. भारत पाकिस्तान सामने अॅशेस पेक्षा चांगले असतात असं बोर्ड सांगेल. जणू काही, भारतीय सैनिक हे परग्रहावरचेच आहेत.
- नियंत्रण रेषेपासून हजारो किलोमीटर लांब राहून शांततेची मागणी करणं फार सोपं आहे कारण तुमच्यासाठी आज रात्री पार्टी कुठे करायची आणि पुढच्या सिनेमासाठी भांडवल कुठनं उभारायचं याचीच तुम्हाला चिंता आहे.
- शांतता हवी हे घोषवाक्य नाहीये ते युद्धसमाप्तीनंतरचं वास्तव आहे. दहा वर्षांची लहान मुलगी आदिती पत्र लिहिते आणि देश म्हणजे काय हे तिला कळलंय हे जाणवतं. याची तुलना महेश भट्टशी करा. माझं मत आदितीला आहे, तुमचं कुणाला हे तुम्हीच ठरवा...
जय हिंद
मेजर गैरव आर्य (निवृत्त)